Salman Khan : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सलमान खानवर त्याच्या पनवेल फार्महाऊजवळ संपवण्याच्या कटात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल येथील फार्महाऊसजवळ सलमानच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दीपक गोगलिया उर्फ जॉनी वाल्मिकी याला राजस्थानमधून अटक केली. राजस्थानच्या भिवानी जिल्ह्यातून दीपक गोगलिया याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या प्रकरणात आता या आरोपींना तिथल्या कुठल्या स्थानिक व्यक्तीने मदत केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचला होता. सलमान खानच्या फार्महाऊसजवळ त्याची कार थांबवून त्याच्यावर एके-४७ रायफलने गोळ्या झाडण्याचा कट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने आखला होता. मात्र याची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आता या प्रकरणात पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, १४ एप्रिल रोजी लॉरेन्स गँगशी संबंधित दोन शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे दोन वाजता आरोपींनी हवेत तीन ते चार गोळ्या झाडल्या. हवेत गोळीबार करून आरोपींनी तिथून पळ काढला होता.