पन्नास पतसंस्थांचा कारभार ठप्प!
By admin | Published: November 18, 2016 02:24 AM2016-11-18T02:24:23+5:302016-11-18T02:24:23+5:30
सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने वसई तालुक्यातील पन्नासहून अधिक पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
शशी करपे/ वसई
सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने वसई तालुक्यातील पन्नासहून अधिक पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पतसंस्थांच्या ठेवी बँकांमध्ये जमा असल्या तरी बँकांकडून दिवसाला फक्त दहा
हजार रुपयेच दिले जात असल्याने सभासद आणि ग्राहकांना दररोज पैसे देता येत नसल्याने सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली
आहे. यामुळे पतसंस्थांवरील विश्वास उडून त्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती संचालक व्यक्त करीत आहेत.
वसई तालुक्यात साधना, कल्पतरू, कॅम्पेनिन, माणिकपूर अर्बन, गार्सिन, सेंट घोन्सालो, जीवन विकास, आगाशी प्रगती, वसई प्रगती, एकता यांच्यासह लहान-मोठ्या मिळून सुमारे पन्नासहून अधिक पतसंस्था आहेत. प्रत्येक गावात आणि शहरात प्रत्येक पतसंस्थांच्या शाखाही आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषत: ख्रिस्ती आणि आगरी समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून पतसंस्था कार्यरत आहेत. पश्चिम पट्ट्यातील हजारो लोक आजही पतसंस्थांवर अवलंबून आहेत. म्हणूनच या पतसंस्थांचे सभासद आणि ग्राहक मिळून सुमारे पाच लाखाच्या घरात ठेवीदार आहेत. दरम्यान, नव्या धोरणामुळे पतसंस्थांकडून ठेवी स्वीकारणे बंद झाले आहे. लोकांना पैसेही परत देता येत नाहीत. महत्वाचे म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे हप्तेही थकू लागले आहेत. पैसे नसल्याने कर्जदार हप्ते देईनासे झाले
आहेत. बहुतेक पतसंस्था महावितरणची बिले स्वीकारतात. त्यातूनही आर्थिक लाभ मिळत असतो. ग्राहकांचीही सोय होते. आता बिले स्वीकारणे बंद झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे.