अन्नपूर्णाने गाठली महिला सक्षमीकरणाची पंचविशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:47 AM2018-02-05T02:47:45+5:302018-02-05T02:47:51+5:30
अन्नपूर्णा परिवाराला मिळणारा नफा हा व्यवसायातून मिळतो. हाच नफा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जाच्या स्वरूपात वापरला जातो.
नवी मुंबई : अन्नपूर्णा परिवाराला मिळणारा नफा हा व्यवसायातून मिळतो. हाच नफा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जाच्या स्वरूपात वापरला जातो. महिलांना नवीन व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी चालना मिळते. अन्नपूर्णा परिवाराने महिला सक्षमीकरणाची पंचविशी गाठली असून सर्व सभासदांचे बँक खाते उघडून दिले आहे.
२०१८पासून रोखरहित व्यवहार प्रणालीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन अन्नपूर्णा परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव यांनी केले. महिलांना उद्योग आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अन्नपूर्णा परिवाराच्या वतीने शनिवारी वाशीतील
सिडको एक्झिबिशन सेंटर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते; या वेळी त्या बोलत होत्या.
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या आहेत. याच योजनेच्या माध्यमातून अन्नपूर्णा परिवाराच्या वार्षिक नफ्यात वाढ होत असल्याने हा नफा कर्जाच्या स्वरूपात महिलांना व्यवसायासाठी दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मायक्रो फायनान्स व्यवसायाला जबरदस्त फटका बसला; कारण मायक्रो फायनान्स देशातील गरीब लोकांना कर्ज पुरविते.
बँकिंग व्यवसायातील अनुत्पादक मालमत्तमध्येदेखील गेल्या पाच वर्षांत वाढ झालेली दिसते; परंतु मायक्रो फायनान्स व्यवसायातील अनुत्पादक मालमत्ता जी गेली ५ वर्षे २ टक्केपेक्षा कमी होती, त्यात वाढ होऊन राष्ट्रीय स्तरावर ९ टक्के व राज्य स्तरावर २० टक्के इतकी झाली.
अन्नपूर्णा केवळ गरिबांना बिनातारण कर्ज सुविधाच पुरवित नाही तर त्यांना एक सर्वंकष आर्थिक पॅकेज ज्यामध्ये कर्ज, बचत, स्वास्थ्य, जीवन व परिवार विमा, म्हातारपणाची सोय म्हणून पेंशन योजना तसेच विना आर्थिक सेवांमध्ये पाळणाघरे, क्लायंट शिक्षण, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण आदी सेवाही पुरवित असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव यांनी दिली.
मेळाव्यांतर्गत २० आदर्श मातांना गौरविण्यात आले. तसेच ११ उत्कृष्ट उद्योजिका आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाºया ९ महिलांचा गौरव करण्यात आला. डॉ. स्मिता शहापूरकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्याविषयी जागरूक करत यंदाच्या बजेटवर मात्र नाराजी व्यक्त केली.
>आर्थिक वर्षात
१५० कोटींचे वाटप
२०१७-१८ या आर्थिक वर्षात अन्नपूर्णा परिवाराने एकूण १५० कोटींचे कर्ज सभासदांना वाटप केले आहे. परिवारातील सदस्यांना १३० लाख एवढी रक्कम आजारपणाच्या दाव्यांपोटी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात अन्नपूर्णाने ३८ लाख एवढी रक्कम मृत्यूच्या दाव्यांपोटी दिली. कमी व्याज दरात जास्त कर्ज, कर्जाची सीमा ही तीस हजार ते वीस लाख विना तारण देणे, आरोग्य विमा हा मागील वर्षीपेक्षा यंदा २० ते ३५ हजार प्रति व्यक्ती असणार आहे.
>नोटाबंदीवर आधारित पथनाट्य सादर करत त्याच्या झालेल्या परिणामांविषयी माहिती दिली. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम, अन्नपूर्णा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.