साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

By नामदेव मोरे | Published: August 9, 2023 05:53 PM2023-08-09T17:53:19+5:302023-08-09T17:54:16+5:30

रुग्णालयांमधील गर्दी वाढली : सर्दी, खोकला तापाने नवी मुंबईकर त्रस्त.

fight against epidemics continues queue of patients for treatment in navi mumbai | साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

साथीच्या आजारांशी लढाई सुरू, उपचारासाठी रुग्णांच्या  रांगा

googlenewsNext

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पावसाचे प्रमाण कमी होताच साथीच्या अजाराने उचल खाल्ली आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. खासगी व महानगरपालिका रुग्णालयामधील रांगा वाढल्या आहेत. महानगरपालिकेचे वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयही फुल्ल झाले आहे. अनेक कुटुंबामधील एकापेक्षा जास्त सदस्य आजारी पडले असून प्रत्येकाने प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची रांग वाढत आहे. प्रतिदिन दीड हजार पेक्षा जास्त रुग्ण ओपीडीमध्ये येत आहेत. यामध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आंतररुग्ण विभागात दाखल होणारांची संख्याही वाढली असून अनेकवेळा बेड फुल्ल होऊ लागले आहेत. नेरूळ व ऐरोली रुग्णालयामध्येही अशीच स्थिती आहे. शहरातील खासगी रुग्णालये, छोटे दवाखाने येथील रुग्ण संख्येमध्येही २५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. संशयीत डेंग्यू, मलेरिया, निमोनियाचे रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. अनेकांना उपचारासाठी एक ते दोन तासही वाट पाहावी लागत आहे.

साथीचे अजार वाढू नये यासाठी महानगरपालिकेने विशेष उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आरोग्य शिबिरे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू व मलेरियाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याचे वास्तव्य असलेल्या परिसरातही सर्वेक्षण केले जात आहे. मनपा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना आयुक्त राजेश नार्वेकर व आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे यांनीही केल्या आहेत.

रुग्णालयात रांगा

महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात केसपेपर काढण्यासाठी सकाळी रांगा लागत आहेत. प्रत्येक ओपीडीच्या बाहेरही उपचारासाठी रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयामध्येही अशीच स्थिती आहे.

कोणाचे आईवडील तर कोणाचा मुलगा आजारी

प्रत्येक घरातील कोणाचे आईवडिल तर कोणाची मुले आजारी आहेत. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबच सर्दी, खोकला, तापाने त्रस्त आहेत. आयसीयूमधील रुग्णांची संख्याही वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये आयसीयूच्या बाहेर नातेवाईक चिंतेमध्ये असल्याचे चित्र आहे.

सामान्यांना महानगरपालिकेचा आधार

शहरातील सर्वसामान्य रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांचाच आधार आहे. मोफत उपचार होत असल्यामुळे वाशी, नेरूळ, ऐरोली रुग्णालयात उपचारासाठी रांगा लागत आहेत. महानगरपालिकेने रुग्णालयामध्ये रुग्ण व नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध केली आहे. रुग्णालयातील स्वच्छतेवरही विशेष लक्ष दिले आहे.

Web Title: fight against epidemics continues queue of patients for treatment in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.