उभारलाय एक लढा...‘पणती’ तेवत ठेवण्यासाठी
By admin | Published: November 18, 2016 03:13 AM2016-11-18T03:13:59+5:302016-11-18T03:13:59+5:30
ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तब्बल आठ हजारांहून सासूसुनांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांची मने जिंकली आहेत.
पंकज रोडेकर / ठाणे
प्रेमाने जग जिंकता येते, असे कोणीतरी म्हटले आहे. या उपदेशातून ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील तब्बल आठ हजारांहून सासूसुनांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांची मने जिंकली आहेत. त्यातूनच वंश चालवायला मुलगाच हवा, असे नाहीतर मुलगी तितकी महत्त्वाची आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवून मुलगा आणि मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. यासाठी सासू आणि सुनांनी हा लढादेखील लढण्याचे ठरवले आहे.
ठाणे जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील स्तनदा माता, गरोदर माता आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्यासाठी काम करताना शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यातच, दुर्गम भागातील महिला आणि बालकांना हा विभाग आरोग्याच्या सुविधांसह त्यांच्या प्रबोधनाचे काम करतो. कुपोषणावर मात करता यावी, हा या विभागाचा हेतू आहे. त्यामुळे या विभागाने वर्षभरात आदिवासी गावपाड्यांतील गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अनेक शिबिरे घेऊन त्यांच्यात जनजागृतीचे काम केले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये गरोदर आणि स्तनदा मातांच्या बाबतीत बरेचसे निर्णय घरातील मोठी व्यक्ती म्हणजे सासूमार्फत घेतले जातात. कुटुंबात सासूची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे मातेच्या आणि बालकाच्या आरोग्याबाबत सासू आणि सून यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत मेळावे घेतले जातात. एवढेच नव्हे तर मेळाव्यात आत्मसात केलेले विचार इतरांनाही सांगणार असल्याचे कबूल केले आहे.