हिरानंदानीची फाईल गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2016 02:32 AM2016-03-28T02:32:56+5:302016-03-28T02:32:56+5:30
महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचाराचा घोळ अद्याप सुटलेला नाही. वादग्रस्त हिरानंदानीच्या कराराविषयीची महत्त्वाची कागदपत्रेच सापडत नसल्याचे स्पष्ट झाले असून
नवी मुंबई : महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचाराचा घोळ अद्याप सुटलेला नाही. वादग्रस्त हिरानंदानीच्या कराराविषयीची महत्त्वाची कागदपत्रेच सापडत नसल्याचे स्पष्ट झाले असून, कागदपत्रे हरविली की मुद्दाम गायब केली याविषयी शंका व्यक्त होत आहे.
शहरवासीयांना मोफत सुपरस्पेशालिटी उपचार मिळावे यासाठी वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयाचा काही भाग हिरानंदानी सुपरस्पेशालिटी रूग्णालयास अल्प भाडेतत्त्वावर दिला आहे. हिरानंदानीने सदर रूग्णालय फोर्टीजला विकले. यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रश्न वादग्रस्त ठरला आहे. शहरवासीयांना सुपरस्पेशालिटीचा फारसा लाभ होत नाही. येथील उपचार परवडत नसल्याने गरीब रूग्णांनी तेथे जाणेच बंद केले होते. पालिकेने सिडकोच्या कराराचा भंग केला असल्यामुळे सदर भूखंड ताब्यात घ्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनी पालिकेकडे याविषयीच्या कराराची माहितीही मागविली होती. परंतु पालिकेने निविदा मागवितानाच्या मूळ नस्ती व इतर महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेमधील कागदपत्रे गहाळ कशी होवू शकतात, जाणीवपूर्वक कोणीतरी ती नष्ट केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.