पेण : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी रविवारी जिल्हा परिषदेसाठी ९ उमेदवारी अर्ज तर पंचायत समिती गणात २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षामध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या उमेदवारांचा समावेश होता. उमेदवारी अर्जांची संख्या एकूण४८ वर पोहचली असून यामध्ये अगोदरच्या १२ अर्जांचा समावेश आहे. पेणमध्ये जिल्हा परिषद गटाच्या पाच जागा आणि पंचायत समिती गणाच्या १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शेकापच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व विद्यमान सदस्या नीलिमा पाटील यांनी पाबळ जिल्हापरिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या होमपीचवर त्यांना नेहमीच विजय मिळाला आहे. जिते जिल्हा परिषद गटात शेकापचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काराव गटात शेकापचे पंचायत समिती उपसभापती महादेव दिवेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. रावे जिल्हा परिषद गटात शेकापचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रमोद भास्कर पाटील या चार प्रमुख बलाढ्य उमेदवारांचे रविवारी अर्ज दाखल झाले.भाजपातर्फेविद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे यांनी वडखळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना ही जागा राखण्यात कितपत यश मिळते याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत. या जागेवर काँग्रेस-शिवसेना आघाडीचे सेना उमेदवार अविनाश म्हात्रे यांच्याशी त्यांची लढत आहेत. सेनेची ही जागा यापूर्वी संजय जांभळे यांनी दोनवेळा शिवसेना-शेकाप युतीतून जिंकली होती. त्यामुळे सेना काँग्रेसच्या मदतीने जांभळे यांना चारीमुंड्या चीतपट करण्यासाठी आडाखे बांधून आहे. या बलाढ्य उमेदवारांनी निवडणूक रिंगणात पाऊल टाकल्याने खरी रंगत वाढली आहे.पंचायत समिती गणात सर्व नवखे उमेदवार असून ते सर्वजण आपआपल्या पक्षीय व कार्यकर्ते यांच्या संघटन ताकदीवरच विजयाचा पल्ला गाठणार आहेत.विद्यमान पंचायत समितीची सत्ता शेकापकडे असून ती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेने आघाडी करून पंचायत समितीवर भाजपाची सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये त्यांना कितपत यश मिळते हे पुढचे दहा दिवस रंगणाऱ्या राजकीय प्रचारातून चित्र स्पष्ट होईल. भाजपा हा नवोदित पक्ष असून त्याची पाटी कोरी आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ते प्रथमच लढत असून संजय जांभळे हे एकमेव भाजपाचे ताकदवान उमेदवार त्यांच्याकडे आहेत. मात्र खरी लढत काँग्रेस विरु ध्द शेकापमध्येच असून रावे या जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य वैकुंठ पाटील विरुध्द शेकापचे प्रमोद पाटील ही लढत प्रेक्षणीय ठरणार आहे. यात दोनही उमेदवार राजकीय वारसा लाभलेले असून काँग्रेसला चीतपट करण्याची अचूक राजकीय खेळी शेकाप धुरीणांनी केली आहे. एकंदर जिल्हा परिषत, पंचायत समिती निवडणूक प्रस्थापित शेकापला सत्तेपासून दूर राखण्यात काँग्रेस शिवसेना आघाडी यशस्वी ठरते का? भाजपा किती त्रासदायक ठरतो, कोण कोणाची मते खेचतो या जरतरच्या पोकळ खेळ्यांवर निवडणुकीचे चित्र उभे आहे. रविवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांसह भाजपा आ. प्रशांत ठाकूर, शेकाप आ. धैर्यशील पाटील या दिग्गज नेत्यांसह शेकाप, राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे अर्ज सादर केले. (वार्ताहर)निवडणुकीसाठी मुरु डमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखलनांदगाव/ मुरुड : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता मुरु ड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीकरिता तहसील कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी जितेंद्र वाघ यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत.शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रशांत मिसाळ व तालुका प्रमुख नीलेश घाटवळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांचे रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. राजपुरी जिल्हा परिषद मतदार संघातून नांदगावचे सरपंच सुर्वे यांच्या पत्नी अपर्णा विलास सुर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राजपुरी पंचायत समिती गणातून वृषाली ऋ षिकांत डोंगरीकर व नांदगाव पंचायत समिती गणातून विद्यमान सभापती काळी नामदेव ठाकूर यांनी अर्ज दाखल केला. उसरोळी जिल्हा परिषद मतदार संघातून राजश्री प्रशांत मिसाळ तर वळके पंचायत समिती गणामधून चंद्रकांत मोहिते यांनी अर्ज दाखल केला आहे. उसरोळी पंचायत समिती गणामधून शिवसेनेचे तालुका प्रमुख नीलेश घाटवळ यांच्या पत्नी नीता घाटवळ यांनी अर्ज दाखल केला आहे. रविवारी शिवसेनेचे सर्व उमेदवार अर्ज दाखल करून प्रचाराला सुरु वात करणार आहेत.सोमवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असून या शेवटच्या दिवसात आघाडीचे सर्व उमेदवार तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले जिल्हा उपप्रमुख प्रशांत मिसाळ यांनी यावेळी सांगितले की, राष्ट्रवादी,शेकाप व काँग्रेस आय पक्ष जरी एकत्र येऊन निवडणूक लढवत असले तरी आम्हाला याचा कोणताही फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत नाही तरी शिवसेना स्वबळावर ही निवडणूक लढवून मुरु ड तालुक्यावर आमचीच सत्ता असेल, असेही ते यावेळी म्हणाले. मुरु ड नगरपरिषदेप्रमाणे तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही सदस्य शिवसेनेचेच असतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पेणमधून ४८ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: February 06, 2017 4:58 AM