फसवणूक प्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल
By admin | Published: January 28, 2017 03:10 AM2017-01-28T03:10:41+5:302017-01-28T03:10:41+5:30
सीलिंकलगत बंगलो प्लॉट देण्याकरिता पैसे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नवी मुंबई : सीलिंकलगत बंगलो प्लॉट देण्याकरिता पैसे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बिल्डरविरोधात यापूर्वी देखील राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
प्रवीण गोरे यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे केली होती. त्यानुसार लँडस्केप ड्रीम्स बिगीन कंपनीच्या पंडित धावजी राठोड या बिल्डरविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ते द्रोणागिरीदरम्यान होणाऱ्या सीलिंक परिसरातील जागेवरील बंगलो प्लॉट या कंपनीने विक्रीसाठी काढले होते. मागील काही महिन्यांपासून इच्छुक ग्राहकांना या बंगलो प्लॉटची विक्री सुरू करण्यात आली होती. त्यानुसार प्रवीण गोरे यांनी देखील सदर कंपनीकडे २ लाख २ हजार रुपये भरले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटून देखील त्यांना प्लॉटचा ताबा दिलेला नव्हता. त्यामुळे गोरे यांनी फसवणूकीची तक्रार गुन्हे शाखा पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, राठोडविरोधात यापूर्वी देखील सांगली, रायगड व पुणे याठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार राठोडविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून इतरही अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता असून, संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)