कर्नाटकमधील फणस बाजार समितीमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:39 AM2019-06-15T01:39:53+5:302019-06-15T01:40:06+5:30
३५० टन आवक : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली
नवी मुंबई : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईसह पनवेलमध्ये कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात फणसाची आवक होऊ लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये दोन दिवसांमध्ये तब्बल ३५० टन फणस आला असून होलसेल मार्केटमध्ये १५ ते २५ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये एप्रिल महिन्यापासून फणसाची आवक सुरू झाली आहे. कोकणसह, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडूमधून फणस विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला फणसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. यामुळे या आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी जादा माल मागविला आहे. १३ जूनला मुंबई बाजार समितीमध्ये ८४ टन फणसाची आवक झाली होती. शुक्रवारी तब्बल २६८ टन आवक झाली असून यामध्ये दक्षिणेमधील फणसाचा वाटा ७५ टक्के आहे. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये १५ ते २५ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली असून किरकोळ मार्केटमध्ये याचे दर दुपटीपेक्षा जास्त आहेत. दक्षिणेकडील राज्यातील येणारा फणसाचा आकार मोठा असल्यामुळे ग्राहकांकडून त्यांना पसंती दिली जात आहे. एपीएमसीमधील व्यापारी व नगरसेवक रामदास पवळे यांनी सांगितले की, सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये फणसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
शनिवारीही आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलपासूनच फणस विक्रीसाठी येत असतो. पनवेलमध्येही कर्नाटकमधून आलेल्या फणसाला मोठी मागणी आहे. कोकणात आंब्याची बागायत ज्यापद्धतीने केली जाते, त्याचपद्धतीने दक्षिणेतील राज्यांमध्ये फणसाची बागायत शेती केली जाते.