नवी मुंबई : खैरणेमधील भीषण आग प्रकरणी आल्मा स्पेशालिटी केमिकल कंपनीचे मालक व सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कंपनीचे मालक समितकुमार प्राणतोशकुमार भट्टाचार्य व सुपरवायझर राजेश मिश्रा यांचा समावेश आहे. औद्योगिक वसाहतीमधील आल्मा कंपनीमध्ये २४ एप्रिलला मध्यरात्री स्फोट होऊन आग लागली. यामध्ये कंपनीत काम करणारे राजेंद्रप्रसाद भुलेश्वर चौहान, माणिकचंद भयाशंकर गौतम व मोहम्मद आस्लम तजामुल हुसेन यांचा समावेश आहे. कंपनीचे मालक व सुपरवायझर यांनी कंपनीमध्ये प्रशिक्षित व कुशल कामगारांची नियुक्ती केली नाही. ज्वालाग्राही पदार्थांची हाताळणी करण्यासाठी योग्य कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे ही दुर्घटना घडली. कामगार काम करतात की नाही, याकडे सुपरवायझरने लक्ष न देता कंपनीमध्ये झोपी गेल्यामुळे रिअॅक्टर प्लांटमध्ये स्फोट होऊन दुर्घटना घडली. या आगीमध्ये प्रोटॉन बायोकेम, वैष्णवी केमिकल, एक्सेल पेट्रोलियम, नारलॅब कंपनीही जळून खाक झाली आहे. दुर्घटनेला जबाबदार धरून संबंधितांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी दिली आहे.
आल्मा केमिकल कंपनीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:17 AM