पनवेल : स्वस्तात घरे देतो, असे सांगून बिल्डर्सकडूून फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी पनवेल पोलीस ठाण्यात दाखल आहेत. शहरातील तिरु पती बालाजी नामक बांधकाम व्यावसायिकाविरोधातही खांदेश्वर पोलीस ठाण्यात शुनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोषकुमार राम सोनावणे यांची ९ लाख ४५ हजार ३०० रु पयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. नवीन पनवेल शहरात या बांधकाम व्यावसायिकांनी सहा ते सात कार्यालये थाटली आहेत. त्याद्वारे हजारो ग्राहकांकडून लाखो रुपये घेऊन घरांसाठी बुकिंग केले आहे. तिरुपती बालाजी नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने अनेक ठिकाणी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून जाहिरातबाजीही केली होती. त्यामध्ये विमानतळ, रेल्व स्थानक, बसस्थानक जवळ असल्याचे दाखले देत ग्राहकांना भुलवण्यात येत आहे. उसर्ली, विचुंबे, आदई, चिपळे, कोप्रोली, भोकरपाडा, देवद आदी ठिकाणी बांधकामाच्या साइट सुरू करतो, असे सांगून हजारो ग्राहकांकडून करोडोंची माया त्यांनी जमा केली आहे. अद्यापपर्यंत या साइटवर कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण करण्यात आलेले नसल्यामुळे दोनशेहून अधिक ग्राहकांनी शनिवारी व रविवारी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती.गेल्या ३ वर्षांपासून तिरु पती बालाजी या बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट देतो, असे सांगून करोडो रु पये घेतले. त्याच पैशातून महागड्या गाड्या घेऊन बांधकाम व्यावसायिक चार-पाच सुरक्षारक्षक घेऊन फिरतात. शहरात सहा ते सात कार्यालये थाटलेल्या या बांधकाम व्यावसायिकाने फसवलेल्या रकमेचा आकडा जवळपास १०० कोटींच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी महेंद्र पवनकुमार सिंग,योगेश सिंग, वीरेंद्र झा आणि ज्ञानेश्वर प्रसाद शर्मा या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील ज्ञानेश्वर प्रसाद शर्मा यास खांदेश्वर पोलिसांनी अटक केली असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.अधिक तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)
पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
By admin | Published: January 11, 2016 2:10 AM