दगडखाण मालकावर होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:06 PM2019-07-09T23:06:55+5:302019-07-09T23:07:05+5:30
आयुक्तांचे प्रशासनास आदेश : डी. वाय. पाटील व्यवस्थापनालाही नोटीस; धोकादायक घरे रिकामी करण्याच्याही सूचना
नवी मुंबई : एमआयडीसीमध्ये नाला बुजवून रस्ता तयार करणाऱ्या दगडखाण मालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. इतर खाणमालकांनाही नोटीस देण्यात याव्यात. नेरुळमध्ये डॉ. डी. वाय. पाटील मैदानामुळे शेजारील वसाहतीमध्ये पाणी जात असून संबंधितांनाही नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिज माफियांनी नैसर्गिक नाल्यामध्ये बांधकामाचा कचरा टाकला आहे. अनेक दगडखाणीमधील कचरा नाल्यांमध्ये गेला आहे. सोमवारी नाल्यातील पाणी बोनसरीमधील घरांमध्ये गेल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अधिकाऱ्यांसोबत या परिसराची पाहणी केली.
येथील महावीर कॉरीजवळील चार झोपड्या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्या. जवळपास १५ घरांमध्ये पाणी गेले. यामुळे विस्थापित झालेल्यांची तुर्भे इंदिरानगरमधील शाळेमध्ये तात्पुरती सोय केली आहे. बोनसरीजवळ पी. एम. शेख या दगडखाणमालकाने त्याच्या खाणीकडे जाण्यासाठी नाल्यावर रस्ता बनविला आहे. यामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद झाला असल्याने संबंधितांना आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार नोटीस बजाविण्यात यावी व गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहे.
पेंटर कॉरी व ओंकार कॉरी चालकांकडून नाल्यातील अडथळे काढून घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या मागील बाजूस आर्मी कॉलनी जवळील रस्त्यावर पाणी साचण्याच्या जागेचीही पाहणी केली. मैदानातून मोठ्या प्रमाणात पाणी रोडवर येत असल्यामुळे संंबंधितांना नोटीस पाठविण्यात यावी व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. नवी मुंबईचा काही भाग समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला किंवा त्याच दरम्यान भरती असल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते. जास्त पाणी साठणाºया ठिकाणी पाणीउपसा पंप व अनुषंगिक व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी २४ तासांमध्ये १२८ मि.मी. पाऊस पडला. सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या चार तासांमध्ये तब्बल ८१ मि.मी. पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आयुक्तांच्या पाहणी दौºयामध्ये शहर अभियंता सुरेंद्र पाटील, परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे, मनोज पाटील, सहायक आयुक्त संध्या अंबादे, संजय तायडे, राजेंद्र सोनावणे व इतर उपस्थित होते.
तुर्भेतील शाळेला नोटीस
तुर्भे सेक्टर २१ व २० येथील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पाणी उपसा पंपामध्ये वाढ केली होती; परंतु येथील अंजुमन शााळेलगत पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता असलेले गटार शाळेने बंद केल्याने त्या भागात पाणी साठल्याचे निदर्शनास आल्यामुळे शाळेलाही नोटीस पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बोनसरीमध्ये संरक्षण भिंत होणार
बोनसरी भागातील नैसर्गिक नाल्यालगतच्या वसाहतीमध्ये सोमवारी पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान झाले. येथील नाल्यामधील मोठे दगड व इतर अडथळे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांनी स्वत: या परिसराची पाणी केली. पुन्हा या ठिकाणी अशाप्रकारची घटना घडू नये, यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा सूचनाही अभियांत्रिकी विभागाला दिल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनामुळे किमान पुढील वर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरणार नाही, अशी अशा रहिवाशांना वाटू लागली आहे.
तुर्भेमध्येही भिंत बांधण्याच्या सूचना
ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शरयू मोटर्सजवळही पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक नाल्याची खोली वाढविण्याचेही आयुक्तांनी प्रशासनाला सूचित केले असून दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्याचे निर्देश दिले.