सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल, निष्काळजीपणाचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 07:01 AM2018-03-12T07:01:22+5:302018-03-12T07:01:22+5:30
सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दोन वर्षात ५० वेळा पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्याविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. परंतु अनेक वर्षांपासून अपघात होत असलेल्या ठिकाणी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. यामध्ये सानपाड्याजवळील जुई पुलाचा समावेश आहे. पुलाचा जुना व नवीन भाग जोडण्यासाठी ७० ते ८० मीटर लांबीचा लोखंडी रॉल बसविण्यात आला आहे. दोन्ही रॉडमध्ये ७ इंचाचा फरक आहे. याठिकाणी मोटारसायकल घसरून अपघात होत आहे. रोडवर पडलेला मोटारसायकलस्वार स्वत:ला सावरेपर्यंत मागून येणाºया वाहनांची धडक बसून त्याचा मृत्यू होत आहे. शनिवारी सायंकाळी अपघात होऊन मुदस्सर नागरबावडी यांचा मृत्यू झाला. २८ फेब्रुवारीलाही या ठिकाणी अपघात होऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. महिन्यातून चार ते पाच गंभीर अपघात याठिकाणी होऊ लागले आहेत.
जुई पुलावर होणाºया अपघाताविषयी वाशी वाहतूक पोलिसांनी २०१६ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जवळपास ५० वेळा पत्रे व स्मरणपत्रे दिली आहेत. अनेक मिटिंगमध्ये या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनीही या विषयावर आवाज उठविला आहे. यापूर्वी नागरिकांनी याठिकाणी आंदोलनही केले होते, परंतु यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही.
येथे होणाºया अपघाताला त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महामार्गावर जुई पुलावरील समस्येविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु प्रशासनाने दुरुस्तीची कामे केली नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. दुरुस्तीची कामे तत्काळ केली नाहीत तर अपघातांचे सत्र सुरूच राहणार आहे.
- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक