मोरबे धरण परिसराच्या सौंदर्यीकरणात पडणार भर; एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:24 AM2019-07-04T04:24:34+5:302019-07-04T04:25:00+5:30

वृक्षारोपणामुळे मोरबे धरण परिसरात हरितपट्टा निर्माण होईल व सौंदर्यीकरणात भर पडेल असा विश्वास महापौर सुतार यांनी यावेळी व्यक्त केला.

 Fill the beauty of Morbe dam area; Resolution of one lakh trees | मोरबे धरण परिसराच्या सौंदर्यीकरणात पडणार भर; एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प

मोरबे धरण परिसराच्या सौंदर्यीकरणात पडणार भर; एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प

Next

नवी मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन या भूमिकेतून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण व संवर्धनावर भर दिला जात असून मोरबे धरण परिसरात महापालिका आणि शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग यांच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक वृक्षारोपण केले जात आहे. या वनमहोत्सवाचा शुभारंभ बुधवार ३ जुलै रोजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पार पडला. या भव्य वृक्षारोपणामुळे मोरबे धरण परिसरात हरितपट्टा निर्माण होईल व सौंदर्यीकरणात भर पडेल असा विश्वास महापौर सुतार यांनी यावेळी व्यक्त केला.
सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने ही १ लाख ५ हजार इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि त्या वृक्षरोपांचे ३0 महिने संवर्धन करण्यात येणार असून यामुळे धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढेल तसेच जमिनीची धूप थांबेल व त्यामुळे धरणात जाणारा गाळ कमी होऊन धरणाची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर हरित होऊन येथील निसर्गरम्यता वाढीस लागून वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. मोरबे धरण परिसरात ४२ हेक्टर क्षेत्रफळावर वड, पिंपळ, उंबर, चिंच, आवळा, मोह, खैर, शिसम, अर्जुन, बेल, कडुनिंब, कैलासपती, बहावा, आंबा अशा विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षरोपांचा समावेश आहे. या १ लाख ५ हजार वृक्ष लागवडीच्या माध्यमातून मोरबे धरण परिसरात पशुपक्षी, फुलपाखरे, कीटक यांचा अधिवास वाढेल आणि परिसराची जैवविविधता वृद्धिंगत होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने या वृक्षलागवडीसाठी व संवर्धनासाठी साधारणता ९ कोटी २८ लाखाहून अधिक खर्च केला जाणार असून या वृक्षारोपणामुळे मोरबे धरण परिसराचे नैसर्गिक मूल्य वाढणार आहे.
मोरबे येथे संपन्न झालेल्या वनमहोत्सवाप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनवणे, उद्यान विभागाचे उप आयुक्त नितीन काळे, सामाजिक वनीकरण रायगड येथील विभागीय वन अधिकारी अप्पासाहेब निकत, सुधागड पालीचे वनक्षेत्रपाल आय.डी.जळगावकर, सहाय्यक संचालक आर.एम.म्हात्रे आदी मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी,
शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्षी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या संकल्पित ३३ कोटी वृक्षारोपणातील १ लाख ५ हजार वृक्षांचे वृक्षारोपण मोरबे धरण प्रकल्प परिसरात होत आहे. मागीलवर्षी याठिकाणी महापालिकेने १0 हजार ५00 झाडे लावलेली असून यावर्षी १ लाखापेक्षा अधिक झाडे लावण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग रायगड यांच्या मागणीनुसार मोरबे धरण परिसरात वृक्षारोपण होत आहे. वृक्षारोपणामधून या परिसराचे पर्यावरणदृष्ट्या महत्त्व वाढणार आहे.
- डॉ. रामास्वामी एन., महापालिका आयुक्त

Web Title:  Fill the beauty of Morbe dam area; Resolution of one lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.