विकासाच्या नावे हजारो हेक्टरवर भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:46 PM2019-07-25T23:46:03+5:302019-07-25T23:46:17+5:30

खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल : १२०० हेक्टर पाणथळी, खाजण जमिनी धोक्यात; स्थलांतरित पक्ष्यांचा आवास नष्ट

Fill thousands of hectares in the name of development | विकासाच्या नावे हजारो हेक्टरवर भराव

विकासाच्या नावे हजारो हेक्टरवर भराव

Next

मधुकर ठाकूर 

उरण : राज्यातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र असलेल्या उरणमधील १२०० हेक्टर जमिनीवर सिडको, जेएनपीटी आणि इतर प्रकल्पांनी विकासाच्या नावे भराव केला आहे. यामुळे पाणथळ क्षेत्रात येणारे स्थलांतरित आणि दुर्मीळ, विविध प्रजातीचे पक्षी कायमचे दृष्टिआड होऊ लागले आहेत. पाणथळ क्षेत्रातील लाखो खारफुटीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास झाला असून, पक्ष्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाबरोबरच पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे.

भरावामुळे नैसर्गिक नालेही बुजविले गेल्याने पाऊस आणि भरतीचे पाणी थेट गावागावांत शिरू लागले आहे. उरण परिसरात विकास व पायाभूत सुविधांच्या नावाने होणारे अतिक्रमणही वाढले आहे. जेएनपीटी, वन, महसूल, सिडको आणि प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे परिसरातील जैवविविधता, तिवरांचे जंगले आणि स्थलांतरित पक्ष्यांचा आवास नष्ट होत आहे.

उरण तालुका हा राज्यातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र आहे. हे पाणथळ क्षेत्र ३२,६०० हेक्टरवर पसरले आहे. खाजण क्षेत्रात समुद्रकिनाऱ्यावर २६ गावांतील मच्छीमार पारंपरिक मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पाणथळ आणि खाजण क्षेत्रातील जलाशये, खाड्या आणि डोहात पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने विविध प्रजातीतील हजारो स्थलांतरित पक्षी उरण परिसरात वास्तव्यासाठी येतात. पक्ष्यांच्या विलोभनीय हालचाली टिपण्यासाठी या ठिकाणी पक्षिप्रेमींचीही मोठी गर्दी असते.

मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी सिडकोने १९७० मध्ये नवी मुंबईच्या निर्मितीसाठी उरण तालुक्यातील २६ गावांतील २७, १५० हेक्टर शेतजमीन आणि सरकारी खाजण जमिनी ताब्यात घेतल्या. त्यापैकी जेएनपीटी २२४० हेक्टर, एनएमएसईझेडकडे १,२५० हेक्टर आणि सिडकोकडे ५,१२७ हेक्टर पाणथळ व खाजण जमीन आहे.

जेएनपीटी बंदर आणि जेएनपीटी अंतर्गत अन्य चार बंदरांच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. भरावात हजारो हेक्टरमधील तिवरांची वने, पाणथळ, खाजण जमीन नष्ट झाली आहे. या जमिनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अति संवेदनशील असल्याने सीआरझेड कायद्यांतर्गत या जमिनीला संरक्षणही देण्यात आले आहे. मात्र, तरीही अशा हजारो हेक्टर खाजण आणि पाणथळ जमिनी भराव टाकून नष्ट करण्यात येत आहेत. मासळी मिळणेही दुरापास्त झाल्याने उपासमारीचे संकट आल्याचे मच्छीमार कृती समिती संघटनेचे सचिव दिलीप कोळी यांनी सांगितले.

जेएनपीटी, सिडको आणि एनएमएसईझेड आदी प्रकल्पांनी ठिकठिकाणी माती भराव करताना गावागावांतून पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक नाले पूर्णत: बुजवले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी, भरतीचे पाणी थेट सोनारी, जसखार, पागोटे, कुंडेगाव, नवघर, भेंडखळ, फुंडे आदी गावांत शिरू लागले आहे.

उरण येथे द्रोणागिरी नोड परिसरात एनएमएसईझेड प्रकल्पाने १८ मे २०१९ रोजी चार एकर क्षेत्रावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील ४६०० तिवरांची कत्तल करण्यात आल्याची माहिती सागरशक्ती आणि वनशक्ती संघटनेचे एनजीओ नंदकुमार पवार यांनी दिली. तसेच जेएनपीटी दास्तान दरम्यान, जासई, पागोटे आणि भेंडखळ आदी ठिकाणच्या एकूण १३५० हेक्टर पाणथळ जागांवर असलेल्या तिवरांच्या झाडांवर अनधिकृतपणे भराव करण्यात आला. यासाठी आवश्यक परवानगी कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतली नसल्याचे आढळून आले आहे.

मासेमारी, स्थलांतरित पक्षी व तिवरांच्या वने, अशी उरणची पुसली जाणारी ओळख कायम राहवी यासाठी गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली असून, यावर अद्याप सुनावणी असल्याची माहिती नंदकुमार पवार यांनी दिली. पाणथळ आणि खाजण जमिनीवर करण्यात आलेल्या भरावाच्या घटना यापूर्वीच्या आहेत. सिडको अशा प्रकारांना पाठीशी घालत नसल्याचा दावा सिडकोचे पर्यावरण व वने विभागाचे नोडल अधिकारी प्रमोद पाटील यांनी केला आहे. नैसर्गिक नाले पुन्हा प्रवाहित करण्यासाठी खारफुटीची अडचण येत असून, न्यायालय यासाठी अनुकूल नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. जेएनपीटी बंदर उभारणीसाठी सिडकोकडून जागा घेतली आहे. त्या जागेमध्ये मिठागरे आणि शेतजमिनीचाच समावेश आहे. या जागेत पाणथळी आणि खाजण जागेचा समावेश नाही, त्यामुळे अशा जागांवर जेएनपीटीने कोणत्याही प्रकारचा भराव केला नसल्याचा दावा जेएनपीटीचे पीपी अ‍ॅण्ड डी विभागाचे मुख्य प्रबंधक एस. व्ही. मदभावी यांनी माहिती देताना केला आहे.

Web Title: Fill thousands of hectares in the name of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.