आंदोलनांवर निघाला अखेर तोडगा, विमानतळ ठेकेदारांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:08 AM2017-11-30T07:08:49+5:302017-11-30T07:08:58+5:30
विमानतळ प्रकल्पाच्या वाहतूकदार ठेकेदारांनी कामाच्या योग्य मोबदल्यासाठी सुरू केलेले आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले, तर खारघरमधील रिक्षा चालकांनी आठवडाभरापासून पुकारलेला
पनवेल : विमानतळ प्रकल्पाच्या वाहतूकदार ठेकेदारांनी कामाच्या योग्य मोबदल्यासाठी सुरू केलेले आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले, तर खारघरमधील रिक्षा चालकांनी आठवडाभरापासून पुकारलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखीचे ठरलेल्या या दोन्ही आंदोलनांवर एकाच दिवशी तोडगा निघाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील कामांवरून मुख्य ठेकेदार व वाहतूकदार यांच्यात वाद निर्माण झाला. कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे सांगत या वाहतूकदार ठेकेदारांनी शुक्रवारपासून काम बंद ठेवून साखळी उपोषण सुरू केले होते. पाच दिवस उलटूनही प्रमुख ठेकेदारांनी या उपोषणाची दखल न घेतल्याने बुधवारी सकाळी हे आंदोलन तीव्र करण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोको करीत या प्रकाराचा निषेध केला. तसेच विमानतळ क्षेत्रात सुरू असलेली उर्वरित कामे बंद पाडण्याचा प्रयत्न दहा गावांतील वाहतूकदार ठेकेदारांनी केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांचा हा प्रयत्न हाणून पाडला. तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सामोपचाराने हे आंदोलन विमानतळबाधित दहा गावांत सुरू असलेली कामे बंद पाडून दहा गावातील ग्रामस्थांनी उर्वरित काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत प्रमुख ठेकेदार आणि वाहतूकदारांची एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला प्रमुख ठेकेदारांच्या वतीने माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या बैठकीत वाहतूकदारांना सुधारित दर देण्याचे मान्य केले. त्यानुसार वाहतूक ठेकेदारांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
उपोषणाला नेत्यांचा पाठिंबा
साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून विविध पक्षातील नेत्यांनी या उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. यामध्ये काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, आमदार मनोहर भोईर, शेकाप माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत, श्याम म्हात्रे आदींसह सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होता. परंतु भाजपाच्या एकाही नेत्याने या उपोषणकर्त्यांची भेट घेतली नसल्याची नाराजी वाहतूकदारांनी व्यक्त केली आहे.
सहा दिवस चाललेल्या या संपात १४९ वाहतूकदार सहभागी झाले होते. त्यांचे सुमारे ३00 डंपर, जेसीबी व इतर वाहने बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी झालेल्या बैठकीत डंपरच्या प्रति फेरीला ६२५ रूपये (अडीच किमीपर्यंत) , पोकलेन (ब्रेकर ) १९५0 , पोकलेन १६५0 ( बकेट ) हे सुधारित दर देण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व वाहतूकदार ठेकेदारांनी हे दर मान्य केल्याने संप मागे घेतल्याची माहिती प्रकल्पग्रस्त लॉरी मालक कल्याणकारी संघटनेचे कवी तारेकर दिली.
प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात रामशेठ ठाकूर टार्गेट ?
नवी मुंबई विमानतळाच्या कामात रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक उपकंत्राटदारांनी ठेके घेतले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांचा यामध्ये समावेश होता. मात्र राजकारण करण्याच्या दृष्टीने केवळ मलाच टार्गेट करण्यात आले असे या प्रकरणाचा तोडगा निघाल्यानंतर रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रि या दिली. सर्व कंत्राटदारांना वाहतूकदारांच्या अटी शर्ती मान्य असतील तर मी विरोध करणारा कोण, असेही यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.