विनोद भोईर
पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीतील एका बाजूच्या जमिनीला भेगा गेल्याने तो भाग कधीही कोसळू शकतो. स्मशानातील व शेडच्या फारशाही तुटल्या आहेत. सभोवताली गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. कोणतीच देखभाल-दुरुस्ती व साफसफाई नाही, अस्वच्छ व सोईसुविधांचा अभाव, जुगारी आणि दारुड्यांचा धुडगूस यामुळे ही स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत आली आहे. विशेष बाब म्हणजे या स्मशानभूमीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे निधीच उपलब्ध नाही.
पाली शहराची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. आणि निम्म्याहून अधिक लोक दहनविधीसाठी यावरच अवलंबून आहेत. बऱ्याचदा दहनविधी झाल्यानंतर संबंधित लोक किंवा ग्रामपंचायतमार्फत साफसफाईदेखील केली जात नाही. रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था नाही. विजेचे दिवे लावल्यावर लगेच चोरून नेले जातात. सभोवतालचे संरक्षक कठडे व बसण्यासाठी असलेले बाकडे मोडले आहेत. फारशाही तुटल्या आहेत. सभोवतालच्या जमिनीला भेगा पडून जमीन खचली आहे. ती केव्हाही नदीत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. गवत वाढले आहे. लोकांना बसण्यासाठी केलेल्या शेडचे सर्व कडप्पे फोडले आहेत. या ठिकाणी नियमित दारुडे दारू पिण्यासाठी येतात. दारूच्या बाटल्या प्लॅस्टिकची वेष्टणे व ग्लास तिथेच टाकतात. जुगारी तर सर्रास असतात. अनेक वर्षांपासून येथे देखभाल-दुरुस्ती न झाल्याने सर्वकाही मोडकळीस आले आहे. तसेच या ठिकाणी पूर्णवेळ कर्मचारीदेखील नसल्याने अंत्यविधिसाठी आलेल्यांची गैरसोय होत आहे. लाकडांची अनुपलब्धता, अस्वच्छता, दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव त्यात दारुड्यांचा उपद्रव यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. स्मशानभूमीची ग्रामपंचायतीने लागलीच दुरुस्ती करावी. तसेच येथे कायमस्वरूपी माणसाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
सरणासाठी लाकडे मिळविताना होरपळपालीतील एकमेव लाकडांची वखार बंद झाल्याने सरणासाठी लागणारी लाकडे नागोठणे येथून आणावी लागतात. गाडीभाडे पकडून तब्बल ३ ते ४ हजार रुपये खर्च होतात. त्यासाठी वेळ व श्रमदेखील वाया जातात. तिथेही लाकडांची कमतरता भासते. पालीतील सांडपाणी अंबा नदीत सोडले जाते. आणि त्याच ठिकाणी स्मशानभूमी आहे. परिणामी केस कापल्यानंतर अंघोळीसाठी व इतर कामासाठी हे दूषित सांडपाणीच वावरावे लागते.
कोविड आणि कर वसुली होत नसल्याने ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नाही. परिणामी स्मशानभूमीची देखभाल-दुरुस्ती करणे शक्य नाही. मात्र निधी उपलब्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल.-ए. एस. जमधाडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, पाली
स्मशानभूमी दुसरीकडे हलवून सर्वांना उपयुक्त ठरेल अशी विद्युत किंवा डिझेलदाहिनी असलेली सोईसुविधांनीयुक्त स्मशानभूमी बनविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या परीने निधी व सहकार्य दिल्यास हे शक्य होईल व लोकांची परवड थांबेल.-विजय मराठे, उपसरपंच, पाली