पनवेल : सिडको उभारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्याच्या घडीला युद्धपातळीवर उलवे टेकडी सपाटीकरण व उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. ९३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सिडकोकडून प्राप्त झाली आहे. डिसेंबरपूर्वी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट असल्याने विमानतळाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.
सिडको एक हजार १६० हेक्टरवर १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ प्रकल्प उभारत आहे. याकरिता येथील दहा गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. डिसेंबरची डेडलाइन चुकू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात कामाला गती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे कामही वेगाने सुरू आहे. दक्षिणेकडील साडेतीन किलोमीटरच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. अशा वेळी यंदाचा पावसाळा सिडकोच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. पाण्याचा निचरा कशाप्रकारे होतो याकडेही सिडकोचे लक्ष राहणार आहे. उलवे नदीचा नैसर्गिक प्रवाह या कामासाठी बदलण्यात आलेला आहे. दहा गावांतील जवळपास सर्वच प्रकल्पग्रस्तांचे ८५ टक्के स्थलांतराचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांनी दिली आहे. मागच्या वर्षी विमानतळ परिसरात असलेल्या डुंगी गावात पाणी साचले होते. यावर्षी ठिकठिकाणी पंपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मागच्या वर्षी गावात आलेल्या पाण्याचा अभ्यास करून यावर्षी असा प्रकार घडणार नाही. याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याची माहिती प्रिया रतांबे यांनी दिली.