महामार्ग रुंदीकरण अंतिम टप्प्यात; कळंबोली-खांदा वसाहतीतील कामही युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:46 AM2018-07-29T03:46:19+5:302018-07-29T03:46:32+5:30
कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत.
- वैभव गायकर
पनवेल : कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत. कोन येथे द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली आहे, त्यामुळे परिसरातील वाहतूककोंडी कमी झाली आहे. कळंबोली आणि खांदा वसाहतीतील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, पनवेल, भिंगारी, काळुंद्रे, कोन या भागात नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्या तुलनेत वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहतुकीसाठी रस्ते अरुंद पडत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. कळंबोली स्टील मार्केट, खांदा वसाहत, अजिवली येथे महामार्ग ओलांडताना अनेक पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. भरधाव वेगाने जाणाºया वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागे, याशिवाय कळंबोली, खांदा वसाहत, तक्का, भिंगारी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. सुट्टीच्या दिवशी तर पळस्पे फाटा ते इलेव्हेंट रोड या दरम्यान येण्याकरिता कधी कधी एक तास खर्ची पडत होता. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारकडे करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत रस्ते विकास महामंडळाने वर्षभरापूर्वी काम हाती घेतले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
ही आहेत कामे
कळंबोली स्टील मार्केटलगत ६१.३७ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. ९० टक्के काम पूर्णत्वास आले असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप दहातोंडे यांनी सांगितले.
खांदा वसाहतीत भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. त्यामधून वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. या मार्गाच्या वर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याकरिता ३.४४ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.
कळंबोली ते पळस्पे फाटा या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण जवळपास झाले आहे. त्याकरिता ५८.२९ कोटींचे बजेट होते, त्यामध्ये गाढी व काळुंद्रे नदीवरील पुलाचांही समावेश होता. पैकी गाढी नदीवर पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.