खारघरमध्ये बंडखोरांच्या मनधरणीत अखेर भाजपाला आले यश
By Admin | Published: May 12, 2017 01:59 AM2017-05-12T01:59:45+5:302017-05-12T01:59:45+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर शहरात ३ प्रभागात १२ जागेसाठी निवडणुका होणार आहेत. तिकीट न मिळाल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत खारघर शहरात ३ प्रभागात १२ जागेसाठी निवडणुका होणार आहेत. तिकीट न मिळाल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांनी बंडखोरीचा रस्ता अवलंबला. यात भाजपाच्या बंडखोरांची संख्या मोठी होती. त्यांनी खारघर विकास आघाडी या स्वतंत्र पक्षाचीही स्थापना केली होती. या आघाडीद्वारे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय भाजपामधील बंडखोरांनी घेतला होता. मात्र भाजपा वरिष्ठ नेत्यांनी या आघाडीच्या सदस्यांशी चर्चा करीत बंडखोरांना थोपवण्यात यश मिळवले आहे.
गुरुवार, ११ मे रोजी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला १२ ही जागांवर विकास आघाडीच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेतले आहेत. बुधवार, १0 मे रोजी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खारघर विकास आघाडीमध्ये काही इच्छुक उमेदवारांमध्ये राजेंद्र ऊर्फ मामा मांजरेकर, विजय पाटील, अजय माळी, संतोष शर्मा या उमेदवारांचा समावेश होता. ११ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. तर खारघर प्रभाग ६ मधून शेकापच्या उमेदवार मंजुळा संतोष तांबोळी यांनी देखील शेकापविरोधात भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. खारघरमध्ये आयोजित बैठकीवेळी रामशेठ ठाकूर यांच्यासह वाय. टी. देशमुख, शंकर ठाकूर, दत्ता वर्तेकर, शत्रुघ्न काकडे आदी उपस्थित होते.