कमलाकर कांबळे / नवी मुंबई बहुचर्चित नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकावर बुधवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अंतिम आर्थिक निविदा सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत २५ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे बुधवारी पात्र ठरलेल्या चारपैकी किती कंपन्या निविदा सादर करतात त्यावर विमानतळाचा विकासक ठरणार आहे. असे असले तरी सुरूवातीपासून विमानतळाच्या उभारणीसाठी इच्छुक असलेल्या जीव्हीके कंपनीलाच संधी मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सुमारे पंधरा हजार कोटी रूपये खर्चाच्या अंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निविदा सादर करण्यासाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झ्युरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांकडून अंतिम आर्थिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली. ९ जानेवारी २0१७ ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत मुंबई विमानतळाचे परिचालन करणाऱ्या जीव्हीके या कंपनीची एकमेव निविदा सिडकोला प्राप्त झाली होती. तर दिल्ली विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीएमआर कंपनीने विविध कारणे पुढे करीत या प्रक्रियेतून माघार घेतली होती. उर्वरित हिरानंदानी व टाटा या दोन कंपन्यांनीही निविदा सादर करण्यास नकारत्मक रोख दर्शविला होता. त्यामुळे ९ जानेवारीनंतर आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेणाऱ्या सिडकोने निविदा स्पर्धात्मक असाव्यात. त्याद्वारे उत्तम अटी व शर्तीवर विमानतळाचे काम व्हावे, यादृष्टीने निविदा सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदत दिली. ही मुदत बुधवार २५ जानेवारी रोजी संपत आहे. या मुदतीत पुन्हा जीव्हीके कंपनीकडून निविदा सादर होण्याची शक्यता आहे. तसेच जीएमआर व हिरानंदानी- झ्युरिच या दोन कंपन्याही निविदा सादर करण्यास इच्छुक असल्याचे समजते. तर मागील काही महिन्यात घडलेल्या अंतर्गत घडामोडीमुळे टाटा रियालिटी ही कंपनी निविदा भरण्यास फारसी उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित जीव्हीके, हिरानंदानी आणि जीएमआर या तीनपैकी एक कंपनीची निवड विमानतळाचा विकासक म्हणून होणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. या मुदतीत प्राप्त होणाऱ्या निविदांपैकी सर्वोत्तम निविदा सादर करणाऱ्या कंपनीला विमानतळाच्या उभारणीचे व परिचालनाचे काम मिळणार आहे. या स्पर्धेत जीव्हीके कंपनीच बाजी मारेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
अखेर विमानतळाच्या विकासकावर मोहर !
By admin | Published: January 24, 2017 6:08 AM