नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूरमधून तिकीट नाकारल्यानंतर बुधवारी राजकीय घडामोडीला वेग आला होता. पुढील दिशा ठरविण्यासाठी सकाळी नाईक समर्थक नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर, गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून नाईक यांना एबी फॉर्मही देण्यात आली. कोकण विभागीय संघटन मंत्री सतीश धोंडे यांनी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत नाईक यांना AB फॉर्म दिला. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते.
नवी मुंबईतील भाजपा नेत्यांच्या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव स्वत: संदीप नाईक व उपस्थित नगरसेवकांनी या बैठकीत मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिल्याने ऐरोलीतून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढतील, हे निश्चित झाले.दरम्यान, यासंदर्भात संदीप नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, ऐरोली आणि बेलापूरमधून भाजपाचे उमेदवार बहुमताने निवडूण येतील, असे स्पष्ट केले. तथापी संध्याकाळपर्यंत सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सूचक विधान करून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
वडिलांसाठी मुलाची माघार
ऐरोली मतदार संघात भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली तर बेलापूर मधून गणेश नाईक यांच्याऐवजी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र, गणेश नाईक यांच्यासाठी त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी स्वतः माघार घेतली. निवडणुकीसाठी गणेश नाईक यांचे नाव पुढे येत असल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाने गणेश नाईक ऐरोलीतून निवडणुकीत उभे राहणार आहेत, असेही संदीप यांनी म्हटले. त्यामुळे वडिलांसाठी पुत्राने आपल्या राजकीय करिअरचा त्याग केल्याचं दिसून येतंय.