- मधुकर ठाकूर
उरण : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या जासई दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरील १२५० मीटर लांबीचा (१.२ किमी ) आणि रांजणपाडा रेल्वे क्रॉसिंग या दोन्ही उड्डाण पूलाचे बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आले आहेत.यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, प्रवासी, वाहन चालक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
जासई -दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यावरील जासई - चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरुन दररोज जड-अवजड आदी हजारो वाहनांची वर्दळ असते.मात्र दर २० मिनिटांनी धावणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे या मार्गावरील रेल्वे फाटकावर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे दास्तानफाटा ते चिर्ले दरम्यान रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-२ हा १२५० मीटर लांबीचा आणि ४७.०२ कोटी खर्चाचा तसेच रांजणपाडा रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-३ हा १०१० लांबीचा आणि १९.३८ कोटी खर्चाच्या दोन्हीही उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.या दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण मावळ खासदार श्रीरंग बारणे, महेश बालदी यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतांतुन त्यांनी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत झाली आहे.राज्यात आणि केंद्रात दोन्ही सरकारे जनतेच्या हिताच्या कामासाठीच अधिक प्राधान्य देत असल्याचेही मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.