अखेर बेलापूर बंदरात होणार पायाभूत सुविधा; रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघरासह पार्किंगची होणार सोय
By नारायण जाधव | Published: August 7, 2023 06:16 PM2023-08-07T18:16:01+5:302023-08-07T18:16:46+5:30
नवी मुंबईतील बेलापूर बंदरातून मुंबई-अलिबाग-वसईकरिता जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून गेल्या वर्षी वाहतूकही सुरू केली.
नवी मुंबई : नवी मुंबईतीलबेलापूर बंदरातून मुंबई-अलिबाग-वसईकरिता जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून गेल्या वर्षी वाहतूकही सुरू केली. मात्र, तेथे रॅम्प, प्रतीक्षा गृह, तिकीटघर, प्रसाधन गृह, सुरक्षारक्षकांची कॅबिन, पार्किंग सुविधा यासारख्या आणि पायाभूत पुरविण्यासाठी सीआरझेडने मेरी टाईम बोर्डास बांधकाम परवानगी मंजूर करून याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी परिवेश समितीकडे पाठविला आहे.
गेल्या वर्षी मेरी टाईम बोर्डाने यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, प्रस्तावासोबत त्यांनी ईआयए अर्थात इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जोडला नव्हता. त्यामुळे सीआरझेडने तेव्हा परवानगी नाकारून ईआयए अर्थात इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सोडून सुधारित आराखडा पाठवावा, अशी सूचना केली होती. त्यामुळे बेलापूर जेट्टीसह इतर पायाभूत सुविधांचे काम पुन्हा रखडले होते. आता त्यास सीआरझेडने अटी व शर्थी घालून हिरवा कंदील दिला आहे.
बेलापूर येथून प्रवासी जलवाहतूक करण्यासाठी जेट्टी बांधण्याकरिता सीआरझेड प्राधिकरणाने मार्च २०१९ मध्ये परवानगी दिली होती. यानंतर केंद्रीय नौकानयन मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये येथील अनेक कामे अपूर्ण असतानाच जलवाहतूक सेवा आणि जेट्टीचे उद्घाटन केले होते. मात्र, अवाजवी भाडे असल्याने ही जलवाहतूक सेवा बंद झाली आहे. तसेच रॅम्प आणि पायाभूत नसताना जलवाहतूक सेवा सुरू करण्याची घाई कशासाठी, रॅम्प आणि पायाभूत सुविधांअभावी अपघात झाल्यास त्यास जबाबदार काेण, असा प्रश्न यामुळे विचारण्यात येत होता.
अशी होणार कामे
1- प्रवासी, कर्मचाऱ्यांची वाहनांची पार्किंग स्टँड- ९५ बाय २५ मीटर
2- हॉवरक्राफ्ट पार्किंग स्टँड- २० बाय २५ मीटर
3- हॉवरक्राफ्टसाठी रॅम्प- २९ बाय १३ मीटर
याशिवाय येथे प्रतीक्षा गृह, तिकीटघर, प्रसाधन गृह, सुरक्षारक्षकांच्या कॅबिनचे काम प्रस्तावित केले आहे. पनवेल खाडीत पश्चिम पूर्वेला वाघिवली गावाच्या समोर ठाणे खाडी दिवाळे गावाजवळ जेथे मिळते, त्या ठिकाणी या सुविधा होणार आहेत.