अखेर जीवाची बाजी लावणाऱ्या हिराेंना न्याय; २६ अग्निशमन जवानांचा केला सत्कार
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 16, 2024 07:15 AM2024-08-16T07:15:00+5:302024-08-16T07:15:27+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर करण्यात आला सत्कार
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: डोंबिवली येथे झालेल्या आगीच्या भीषण दुर्घटनांमध्ये खरी जीवाची बाजी लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अखेर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर सत्कार करण्यात आला. त्यांनी लावलेल्या जीवाच्या बाजी अव्हेरून वरिष्ठांनी त्याचे श्रेय अवघ्या तीन अधिकाऱ्यांना देऊन त्यांचा १ ऑगस्टला सत्कार केला होता. याबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उद्योग मंत्र्यांकडे खंत व्यक्त करताच प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी असलेल्या २६ जणांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डोंबिवली येथे मे महिन्यात भीषण आगीची दुर्घटना घडली होती. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, तर ६६ जण जखमी झाले होते. या बचावकार्यात अंबरनाथ अग्निशमन दलासोबत रबाळे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीदेखील जीवाची बाजी लावली होती. मात्र, १ ऑगस्टला एमआयडीसी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात वरिष्ठांच्या मर्जीतल्या तीन अधिकाऱ्यांना संपूर्ण बचावकार्याचे श्रेय दिले होते. या तीन अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याबाबत अग्निशमन दलाच्या कर्मचारी संघटनेने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, तर कर्मचाऱ्यांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात येताच उद्योग मंत्र्यांनी बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्वच अग्निशमन जवानांचा सत्कार करण्याचे सूचित केले होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्या २६ अग्निवीरांचा सन्मान केला.
उदय सामंत यांचे मानले आभार
सन्मानसोबत त्यांना प्रोत्साहनपर रकमेचा धनादेशदेखील दिला. त्यामध्ये रबाळे एमआयडीसीच्या १२, अंबरनाथच्या ९, तर तळोजातील ५ अधिकारी व जवानांचा समावेश आहे. हा केवळ सत्कार नसून, भविष्यातल्या दुर्घटनांमध्ये परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिलेले बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तर कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार व्यक्त केले.