अखेर कल्याण-कर्जत महामार्ग १०० फुटी
By Admin | Published: November 28, 2015 01:12 AM2015-11-28T01:12:12+5:302015-11-28T01:12:12+5:30
शहरा मधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या १०० फुटी रुंदीकरणाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून ८२१ दुकानांसह घरे बाधित होणार आहेत
उल्हासनगर : शहरा मधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत महामार्गाच्या १०० फुटी रुंदीकरणाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून ८२१ दुकानांसह घरे बाधित होणार आहेत. बाधितांना पर्यायी जागा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली असून शासनाच्या निर्णयाने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.
उल्हासनगरच्या मधोमध कल्याण-कर्जत महामार्ग जात असून रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीएने हाती घेतले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी ५० ते ६० फूट असल्याने वाहतूककोंडी नेहमीची झाली आहे. यामुळे हे रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र, १०० फुटी रस्ता रुंदीकरणाचा फटका ८२१ दुकानांसह तीन रहिवासी इमारतींना बसत आहे. रस्ता १०० ऐवजी ८० फुटी करण्याची मागणी स्थानिक राजकीय पक्षांसह व्यापाऱ्यांनी शासनासह मुख्यमंत्र्यांकडे केली.
तत्कालीन पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी भविष्यातील विचार करता रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण कसे आवश्यक आहे, याची टिप्पणी शासनासह मुख्यमंत्र्यांना दिली होती. गेल्या ३ वर्षांपासून रस्त्याचे भिजत घोंगडे असून रस्ता बांधकाम करण्याची मुदत ३१ मार्च २०१५ रोजी संपली आहे. रस्त्याची मुदत संपल्याने एमएमआरडीएवर पुन्हा फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे. पालिकेने बाधित दुकानांना नोटिसा दिल्या असून कारवाईचे संकेत आयुक्त मनोहर हिरे यांनी दिले
आहेत.
महापालिकेने बाधित व्यापाऱ्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच स्थानिक राजकीय पक्षांनी १०० ऐवजी ८० फूट रस्ता रुंदीकरण करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून शासनाला पाठविला होता. ठराव विखंडित करून रस्ता १०० फुटी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांत नाराजी पसरली असून मुख्यमंत्र्यांना पुन्हा साकडे घालणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)