अखेर नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार; सिडकोकडून भागीदाराचा शोध सुरू
By नारायण जाधव | Published: September 14, 2023 07:00 PM2023-09-14T19:00:06+5:302023-09-14T19:00:21+5:30
नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. नेरूळ येथे साडेतीन हेक्टर क्षेत्रावर १११ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जेट्टीवरून ही जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे मेरिटाइम बोर्डाने जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी अनास्था दाखविल्याने अखेर सिडकोनेच दोन पाऊले पुढे टाकून जलवाहतूक सुरू करण्यासाठी भागीदार निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नेरूळची जेट्टी धूळ खात असून वापर नसल्याने तिच्या देखभालीवर सिडकोला लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीए आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यासाठी नेरूळ येथे जेट्टी बांधली आहे.
एप्रिल २०१८ मध्ये तिच्या बांधकामास सुरुवात झाली होती. मात्र, कोरोनामुळे ते रखडले होते. मात्र, तरीही सिडकोने सप्टेंबर २०२१ मध्ये या जेट्टीचे काम पूर्ण केले. यासाठीचा संपूर्ण खर्च सिडकोने उचलला असला तरी मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मेरीटाइम बोर्डानेही प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करून निविदासुद्धा मागविल्या होत्या. शिवाय प्रस्तावित तिकीट दरसुद्धा जाहीर केले होते. मात्र, त्यापुढे काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी मागील दोन वर्षांपासून प्रवासी वाहतुकीचा श्रीगणेशा झालेला नाही.
विशेष म्हणजे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत या जेट्टीच्या बांधकामानंतर बेलापूर येथे नव्याने बांधलेल्या जेट्टीवरून १७ फेब्रुवारी २०२२ रोजी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. मात्र, प्रवास भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. तर नेरूळ येथे सिडकोची अत्याधुनिक जेट्टी तयार असूनही तीवरून आजपर्यंत जलवाहतूक सुरू झालेली नाही. याबाबत टीका होऊ लागल्याने अखेर सिडकोने मेरीटाइम बोर्डाच्या नादी न लागता आता सिडकोने स्वत:च ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन भागीदाराच्या शोध घेण्यासाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे.
तीन वर्षांसाठी देणार परवाना
जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी जो सिडको भागीदार निवडणार आहे, त्यास पहिल्या टप्प्यात तीन वर्षांकरिता जलवाहतूक टर्मिनलचे संचलन, देखभालीसह व्यवस्थापनाचे काम देणार आहे. यासाठी इच्छुक निविदाकारास गेल्या वर्षांत सरकारी संस्था, सरकारी उपक्रम, प्रतिष्ठित खासगी एजन्सी अंतर्गत किमान तीन वर्षांचा जलवाहतूक सेवेचा, जलवाहतूक टर्मिनलचे संचलन, देखभालीसह व्यवस्थापनाचा अनुभव हवा. त्याच्याकडे मेरीटाइम बोर्डाने दिलेला जलवाहतुकीसह फेरी आणि रो रो सेवा किंवा हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन सेवेचा परवाना हवा.