पनवेल : गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सिडकोच्या १३०० सफाई कामगारांनी पुकारलेला संप मंगळवारी, तब्बल सातव्या दिवशी स्थगित करण्यात आल्याची माहिती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी दिली. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.सिडको नोडमधील रस्ते, वसाहती, सिडको कार्यालये, स्मशानभूमी, रेल्वे स्थानक, मलेरिया औषध फवारणी आदी विभागात सफाई कामगार म्हणून काम करणारे १३०० कामगार बुधवार, १२ एप्रिलपासून संपावर गेले होते. कामगारांना चतुर्थ श्रेणी पगार देणे, ३ लाखांपर्यंत आरोग्य विमा द्यावा, सिडकोच्या वतीने कामगारांना स्वस्तात घरे उपलब्ध करून द्यावीत आदींसह एकूण १७ मागण्या या कामगारांनी सिडको प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून या कामगारांना पगारवाढही मिळाली नसल्याने कामगारांनी कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला. मात्र या आंदोलनामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लोकांच्या भावना तीव्र होताना दिसून येताच सिडको प्रशासनाने कोकण श्रमिक संघटनेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांच्यासोबत बैठक घेवून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी मंगळवारी आंदोलन मागे घेतले.
अखेर पनवेलकरांची ‘कचऱ्या’तून सुटका
By admin | Published: April 19, 2017 12:57 AM