नवी मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या धरमतर खाडीवरील रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाच्या बांधकामाचे एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिलेले कंत्राट अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रद्द केले आहे. या पुलाच्या बांधकामानंतर मुंबई - नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर तब्बल ४० किमीने कमी होणार आहे.
ही कंपनी बांधत असलेला बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवरील पूल काम पूर्ण होण्याआधीच कोसळला आहे. यामुळे या कंपनीच्या राज्यातील सर्व कामांच्या दर्जाबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर राजकीय पक्षांनीही चौकशीची मागणी केली होती.
तीन कामांसाठी संयुक्त कंत्राट मागविल्याने खर्च २,१०० कोटींवर -अखेर रस्ते विकास महामंडळाने एस. पी. सिंगला कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून या रेवस - करंजा पुलाच्या कामासाठी तीन टप्प्यात संयुक्त निविदा मागविल्या आहेत. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला दिलेले २.०४ किमी लांबीचा पूल बांधण्याचे कंत्राट ७९७ कोटी ७७ लाखांचे होते. परंतु, आता तिन्ही कामांचे संयुक्त कंत्राट मागविल्याने त्याचा खर्च २,०७९ काेटी २१ लाखावर गेले आहे. यात मुख्य पूल २.०४ किमीचा असून, करंजा बाजूकडील रस्ता ५.१३१ किमी आणि रेवस बाजूकडील रस्ता ३.०८३ किमीचा असणार आहे. दहा वर्षांच्या देखभालीच्या बोलीवर नवे कंत्राट काढले आहे.
गोरेगाव - मुलुंड उन्नत मार्गाचे घेतले आहे कंत्राटविशेष म्हणजे एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स कंपनीला राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव - मुलुंड उन्नत मार्ग, गोरेगाव या ६ पदरी उड्डाणपुलाचे ६०० कोटी ६६ लाख ७८ हजार इतक्या रकमेचे हे कंत्राट दिले आहे. मात्र, गंगा नदीवरील पूल कोसळल्यानंतर या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकून दक्षता समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना दिले होते. त्यावर मुंबई महापालिकेने अद्याप कोणताच निर्णय घेतला नसला तरी रस्ते विकास महामंडळाने आपले धरमतर खाडीवरील रेवस - करंजा दरम्यानच्या २.०४ किमी लांबीच्या पुलाचे कंत्राट रद्द करून आघाडी घेतली आहे.
१०० कोटी कमी दराने घेतले होते कामरेवस - करंजा पुलाच्या बांधकामासाठी एकूण सहा कंपन्या इच्छुक हाेत्या. त्यातील ११.१३ टक्के कमी दराने निविदा भरणाऱ्या एस. पी. सिंगलाचे कंत्राट मंजूर केले आहे. या कंत्राटाची मूळ किंमत ८९७ कोटी ६८ लाख इतकी असून, एस. पी. सिंगलाने त्यापेक्षा १०० कोटी कमी दराने ते घेतल्याने त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.
हे होते स्पर्धक सहा कंत्राटदार*एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स (एसपीएससीएल) ७९७.७७ कोटी,लार्सन अँड टुब्रो ८७३.१० कोटी,जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स ८८८.०० कोटी,रेल विकास निगम लिमिटेड ९२२.५० कोटी,ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ११०२.५० कोटी,अशोका बिल्डकॉन १२८९.७० कोटी.
दोन्ही पुलांमध्ये हे होते साम्यबिहारच्या भागलपूर येथे गंगा नदीवरील निर्माणाधीन ४०० मीटर पूल कोसळला आहे. बिहारमधील पूल गंगा नदीवर बांधण्यात येत होता. तर रेवस-करंजा पूल खाडीवर बांधण्यात येत आहे. दोन्ही पूल पाण्यात बांधण्यात येत आहेत, हे यातील प्रमुख साम्य आहे.