अखेर नवी मुंबईत कडक निर्बंध लागू, कंटेनमेंट झोनमध्ये महापालिका आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:06 AM2021-03-18T10:06:05+5:302021-03-18T10:07:24+5:30
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
योगेश पिंगळे -
नवी मुंबई :नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ मार्च २०२१ पर्यंत लॉकडाऊन लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचित केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
शहरातील चित्रपटगृहे, हॉटेल, रेस्टाॅरंट, शॉपिंग मॉल, आदी ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्स, हॅन्ड सॅनिटायझर, आदी सुविधांची उपलब्धता करण्यात यावी. नियमांचे उल्लघंन झाल्यास संबंधित चित्रपटगृहे, हॉटेल, रेस्टाॅरंट, शॉपिंग मॉल, आदींवर कोरोना संपेपर्यंत पूर्णतः बंदी घालण्यात येणार असून, दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
शहरात कोणताही सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कार्यक्रम राबविण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती नसाव्यात तसेच अंत्यविधीसाठी २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गृह विलगीकरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच आरोग्य विभागाशी संबंधित सेवा तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालये सेवा आस्थापना ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शक्यतो वर्क फ्राॅम होमचा मार्ग अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यास त्याच्या संपर्कात आलेल्या २८ ते ३० नागरिकांची नोंदणी करून त्यांची चाचणी केली जात आहे.सुविधांची उपलब्धता
- गेल्यावर्षी नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात सुमारे १४ ठिकाणी सर्वसुविधांयुक्त कोविड सेंटर सुरू केले होते. त्यामधील एक हजारांहून अधिक खाटांचे वाशी एक्झिबिशन येथील कोविड सेंटर हे सुरूच ठेवण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने इतर कोविड सेंटरचा आवश्यकतेनुसार पुन्हा वापर सुरू करण्यात येणार आहे.
२४ तास सुविधा
शहरातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता यावा यासाठी महानगरपालिकेच्या नेरुळ, वाशी आणि ऐरोली या तिन्ही रुग्णालयांमध्ये २४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गरोदर महिलांसाठी विशेष सुविधा
- गरोदर महिलांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे तसेच प्रसूतीची सुविधा देखील उपलब्ध असावी यासाठी बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात ८ नोव्हेंबरपासून नियोजन केले आहे. या रुग्णालयात १३१ महिलांवर उपचार करण्यात आले असूनस बाधित २८ महिलांची प्रसूती झाली आहे.३७ लसीकरण केंद्र
- नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथील ३ रुग्णालये, तुर्भे येथील माता बाल रुग्णालय तसेच १८ नागरी आरोग्य केंद्रे अशा २२ ठिकाणी विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय १५ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत असून प्रतिडोस २५० रुपये इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे.
नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणावर जनजागृती केली आहे. तरी मार्केट परिसरातील गर्दी कमी होताना दिसत नाही. तसेच कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता अतिरिक्त आणि कडक निर्बंध लागू करण्याची गरज पडू शकते. दुकान, मॉल किंवा मंगल कार्यालय आदी ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळ्यास ती आस्थापना कोविड पूर्णपणे संपेपर्यंत बंद केली जाऊ शकते. फक्त दंडात्मक कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता गुन्हे दाखल करणे, सील करणे अशा पद्धतीने कारवाया केल्या जात आहेत.
- अभिजित बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका