नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाने अखेर ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील ती १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून, महापालिकेची पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर हद्द निश्चितीसंदर्भातील आदेश सोमवारी रात्री उशिराने काढले आहेत. या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करून त्या संदर्भातील हरकती व सूचना एका महिन्याच्या आत शासनाने मागविल्या आहेत. शासनाने काढलेल्या या आदेशानंतर १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने आनंद व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकींवर बहिष्कारया गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. त्यानंतर रात्री ती महापालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश निघाले.
ही आहेत ती १४ गावे -दहिसर, मोरी, निघू, वाकळण, नावाळी, भंडार्ली, बाळे, बामार्लि, गोठेघर, उत्तरशिव, पिंपरी, नारीवली, नागाव यांचा यात समावेश आहे.
पूर्वी ही गावे होती महापालिकेत -ही गावे १९९५ साली ही नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होती. येथून दोन नगरसेवक निवडून आले होते. येथे रस्ते, गटारे, पायवाटा. माता बाल रुग्णालय नवी मुंबई महापालिकेने बांधले होते. मात्र मालमत्ताकर वाढीवरून ती बाहेर पडली होती.