अखेर हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याचा मत्स्य व्यवसाय विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:41 PM2022-11-15T20:41:08+5:302022-11-15T20:41:15+5:30
राज्यातील मच्छीमारांच्या सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
मधुकर ठाकूर
उरण: राज्यातील मच्छीमारांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि यासाठी लोकप्रतिनिधींच्या साथीमुळे अखेर १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मच्छीमारांना बंद करण्यात आलेला डिझेल पुरवठा व डिझेल परतावे पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय करण्यात आल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयामुळे हजारो मत्स्यव्यवसायिकांना लाभ होणार आहे.
राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १२० अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयामुळे सुमारे ७००० मच्छीमारांना डिझेल कोटा बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले होते. राज्यातील सर्वच मच्छीमार संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या. शासनाने घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून विविध मच्छीमार संस्था, मच्छीमारांनी शासनाविरोधात चर्चा,निवेदन, निषेध, मोर्चे, आंदोलने आदि मार्गाने संघर्ष सुरू केला होता.
मच्छीमारांच्या या संघर्षाला काही लोकप्रतिनिधींचीही साथ लाभली होती.दोन दोन दिवसांपूर्वी करंजा येथे राज्यातील विविध मच्छीमार संस्था व सुमारे ५५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शासनाला मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील मच्छीमारांच्या सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि यासाठी लोकप्रतिनिधींचीही मिळालेली दमदार साथ यामुळे अखेर १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मच्छीमारांना बंद करण्यात आलेला डिझेल पुरवठा व डिझेल परतावे पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी परिपत्रकही जारी करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयाचा हजारो मत्स्यव्यवसायिकांना लाभ होणार
आहे.