अखेर डिझेलमाफिया बाबाची मोडली दहशत, पोलिसांवरही करायचा हल्ले
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 7, 2024 02:38 PM2024-03-07T14:38:18+5:302024-03-07T14:39:24+5:30
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांमध्ये संतोष राठोड (४४) ऊर्फ बाबा याची सातत्याने चर्चा रंगत होती.
नवी मुंबई : ड्रग्ज प्रकरणात कोपर खैरणे पोलिसांनी संतोष राठोडला अटक केल्याने त्याची दहशत मोडीत निघाली आहे. डिझेल चोरीचे रॅकेट चालवत असताना तो कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर देखील जीवघेणे हल्ले करायचा. यामुळे काही अधिकारी जिद्दीने त्याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, मध्यंतरी काही कालावधीसाठी तो भूमिगत होऊन ड्रग्जच्या धंद्यात उतरला होता.
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांमध्ये संतोष राठोड (४४) ऊर्फ बाबा याची सातत्याने चर्चा रंगत होती. त्याच्याकडून शहरात डिझेल चोरीचे मोठे रॅकेट चालवले जात होते. तो एपीएमसी, नेरूळ, सीबीडी परिसरात उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमधील डिझेल चोरी करायचा. अशावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांच्या अंगावर त्याची गाडी घालायचा. शिवाय गुन्हा केल्यानंतर पळताना पोलिसांना इशारे करून पकडून दाखवण्याचे आव्हान द्यायचा. एपीएमसीत दोनदा त्याने बीट मार्शलवर गाडी घातल्याने पोलिसांमध्ये देखील त्याची दहशत झाली होती. अखेर २०१६ मध्ये एपीएमसी पोलिसांच्या पथकाने त्याच्या कायमच्या मुसक्या आवळण्याच्या उद्देशाने ठोस पाऊल उचलत सहा जणांना थरारक पाठलाग करून अटक केली होती. ते सर्वजण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत.
एनडीपीएसच्या गुन्ह्यात दोघांना अटक झाल्यानंतर देखील त्यांच्याकडून आजाराच्या दाखल्याची ढाल वापरून सुटकेचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
सुटण्यासाठी वापरायचा ‘खाकी’चे ज्ञान
या टोळीने मागील दहा वर्षांत डिझेल चोरीसोबतच महिलांवर अत्याचारासह इतरही गंभीर गुन्हे केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. त्याला घरातूनच कायदेशीर ज्ञान मिळत असल्यानेही तो अनेकदा पोलिसांच्या तावडीतून सुटायचा. दाखल गुन्हा, तपासाची कागदपत्रे, पंचनामा यातल्या त्रुटी बारकाईने बघून ‘बाबा’ कसा सुटेल यासाठी ‘खाकी’चे ज्ञान वापरले जात होते.
आजाराच्या प्रमाणपत्रावर मिळवतो जामीन
- वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या पथकाने संतोष राठोडची दहशत कायमची मोडीत काढण्यासाठी त्याच्यावर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळून आले असते, मात्र त्याची पत्नी सागर हिने ते सोबत घेऊन पळ काढला होता.
- तिच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्याने त्यांना एनडीपीएसच्या गुन्ह्यात कोठडीची हवा दाखवली आहे. संतोषला अटक केल्यानंतर न्यायालयात सहानुभूती मिळेल, अशा गुप्त आजाराचे प्रमाणपत्र त्याची पत्नी सागर ही न्यायालयापुढे हजर होत करायची. त्याद्वारे जामिनावर सुटल्यानंतर दोघे पुन्हा गुन्हे करत होते.