बदलापूर : मुरबाड मधील माळशेज घाटाच्या डोंगरावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ग्लास वॉक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाच्या वित्त विभागाने तत्वतः आर्थिक मान्यता दिली आहे. तसेच या प्रकल्पाचा सविस्तर आर्थिक आढावा सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. माळशेज घाटाला पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून ग्लास स्काय वॉक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जगातील इतर देशांनी उभारलेल्या स्काय वॉकपेक्षा हा स्काय वॉक दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट ठरवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विस्तृत आराखडा तयार करण्यात आला. या आराखडाला केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली होती.
आता या क्लास वॉकच्या उभारणीसाठी राज्य शासनाने आर्थिक मंजुरी दिली असून नेमका किती खर्च येणार याचा विस्तृत आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबवण्यास देखील शासनाने तत्वता मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत माळशेज घाटातील ग्लास स्कायवॉक ची माहिती घेण्यात आली तसेच या प्रस्तावाला सर्व मंजुरी घेऊन तत्काळ अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाने देखील या प्रकल्पाला मंजुरी दिली असून आता राज्य शासनाच्या माध्यमातून तत्काळ हे काम पूर्ण करावे यासाठी जलद गतीने सर्व कार्यवाही आणि मंजुरी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिले आहेत.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लास वॉक उभारण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याच सोबतच त्याच्या सुरक्षेच्या चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर किंवा बीओटी तत्त्वावर राबवल्यास कोणता पर्याय सर्वोत्कृष्ट राहील याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- या प्रकल्पाला आर्थिक मंजुरी देण्याची तत्त्वता मान्यता देण्यात आली असून सर्व परवानग्या उपलब्ध झाल्यावर त्याची निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याचे या बैठकीत निर्णय झाला.
माळशेज घाटात ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत केलेला पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आले आहे. पर्यावरणाला बाधा निर्माण न करता हा प्रकल्प सर्वोत्कृष्ट करण्याचा हेतू राज्य शासनाचा आहे आणि तो यशस्वी केला जाईल. - किसन कथोरे, आमदार