अरुणकुमार मेहत्रे।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात २४ मार्चपासून ते आजतागायत खासगी वाहतूक बंद आहे. त्यामुळे वाहतूकदारांना जबर फटका बसला आहे. विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे याची चिंता वाहनचालकांना लागली आहे. शासनाकडून हप्ते पुढे ढकलून दिलासा दिला असला तरी त्यावरील व्याज कसे भरणार, हा मोठा प्रश्न खासगी वाहतूकदारांना पडला आहे. खासगी वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मुंबई बस मालक संघटनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मुंबई येथून गावी जाण्यासाठी तसेच शाळा, कंपनी, मिनी बसेस, टुरिस्ट बसेस, मुंबई दर्शन करणाऱ्या अशा अनेक बसेसमधून खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. लॉकडाउनमुळे सर्व बसेसच्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईसह नवी मुंबईत ३५०० खासगी बसेस आहेत. त्यावरील १ लाख २० हजार ड्रायव्हर, क्लीनरवर उपासमारीची वेळ आली आहे.लाखो रुपयांची गुंतवणूक करून बस व्यवसाय बंद असल्याने बस मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर खासगी बसेसच्या माध्यमातून मेकॅनिक, ड्रायव्हर, क्लीनर, पिकअपमॅन, वसुलीदार, मॅनेजर, चेकर अशा सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मुंबई, बोरीवली येथून पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, गोवा, लातूर, औरंगाबाद, विदर्भ, महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात या राज्यातही खासगी बस सेवा दिली जाते. त्याचबरोबर स्कूल बसेस, टुरिस्ट, मिनी बसेस कंपनीसाठी सुविधा या बसेसनुसार पुरविल्या जातात.महामंडळ बसेस यांना वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. लॉकडाउनमधील नियमांचे पालन आम्हीसुद्धा करण्यास तयार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून क्षमतेपेक्षा कमी प्रवासी प्रवास करतील.आम्हासही वाहतूक परवानगी देण्यात यावी, असे मुंबई बस मालक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. पाचव्या लॉकडाउन काळात काही नियम शिथिलकरण्यात आल्याने बससुद्धा सुरू होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.दोन महिन्यापासून बसेस बंद असल्यामुळे लाखोचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ड्रायव्हर, क्लिनरवर उपासमारीची वेळ आली आहे. महामंडळ बसेस यांना वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे. आम्हालाही परवानगी देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर विचार करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. - के. पी. शेट्टी, अध्यक्षमुंबई मालक बस संघटना
खासगी प्रवासी वाहतूकदारांसमोर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:20 AM