नवी मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळा आॅनलाइन सुरू आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांचे मात्र कबंरडेच मोडले आहे. कोविडमुळे व्हॅन चालकांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मोठी आहे. या शाळांतून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसबरोबरच छोट्या व्हॅन उपयुक्त ठरल्या आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात सध्या ३५0 ते ४00 स्कूल व्हॅन धावतात. यातील अनेकांनी बँका किंवा इतर वित्तसंस्थांकडून व्हॅन खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. ताळेबंदीमुळे यातील जवळपास ४0 टक्के व्हॅनधारकांचे हप्ते थकले आहेत. त्याच्या वसुलीसाठी बँकांकडून तगादा सुरू असल्याचे व्हॅन चालक सांगतात. कोणत्याही प्रकारचे कर्ज फेडीसाठी दोन वर्षांची मुदत देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकाराचे प्रयत्न सुरू आहेत. स्कूल व्हॅन चालकांना त्याचा कितपत लाभ मिळेल, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारने स्कूल व्हॅन चालकांना न्याय देण्याच्या दृष्टीने ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत शिवशक्ती विद्यार्थी वाहतूक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील धोंडू पाटील यांनी व्यक्त केले आहे.मागील पाच महिन्यांपासून सर्व व्हॅन जागेवर पडून आहेत. वापर नसल्याने त्या पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. अनेक व्हॅनचे टायर व बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे व्हॅन चालक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन व्हॅन चालकांना दिलासा द्यावा, तसेच ज्यांचे हप्ते थकले आहेत, त्यांचे व्याज दर माफ करावे, अशी मागणी सुनील पाटील यांनी केली आहे.
स्कूल व्हॅन चालकांचे आर्थिक गणित बिघडले, उदरनिर्वाहचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 12:36 AM