कोट्यवधींची आर्थिक उलाढाल
By Admin | Published: November 9, 2015 02:47 AM2015-11-09T02:47:39+5:302015-11-09T02:47:39+5:30
ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही
आविष्कार देसाई, अलिबाग
ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात या वर्षी सुमारे १४५ फटाके विक्रीचे स्टॉल उभे राहिले आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. मात्र यामुळे प्रदूषणाची समस्याही तितकीच वाढत असल्याचे पर्यावरणप्रेमी यांचे म्हणणे आहे.
दिवाळी तेजोमय प्रकाशाचा आणि आनंद द्विगुणित करणारा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. खमंग फराळाच्या जोडीला फटाक्यांची आतषबाजी ही तितकीत महत्त्वाची मानण्याची परंपरा आजही तग धरुन आहे. दिवाळीमध्ये फटाके उडविण्याचे फॅड अद्यापही कायम आहे. त्यामुळेच या वर्षी महसूल प्रशासनाकडे आलेल्या प्रस्तावातून १४५ फटाके विक्री करणाऱ्या स्टॉलना परवानगी देण्यात आली आहे. फटाके विक्री करण्यामध्ये काही नवतरुणांचा एखादा ग्रुप आपापल्या खिशातून रक्कम गोळा करतो. त्याच्या माध्यमातून होलसेल मार्केटमधून फटाके विकत घेऊन त्याची किरकोळ विक्री तो करतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये चार पैसे जवळ आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसते. प्रत्येक तालुक्यात असे स्टॉल मोठ्या संख्येने टाकल्याचे आपल्याला दिसून येते. फटाके उडवू नयेत याबाबत विविध संघटना, संस्था समाजामध्ये जनजागृती करीत आहेत.
फटाके वाजवूनच दिवाळी साजरी केली पाहिजे हे काही जरुरीचे नाही. फटाक्यांमुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. याची जाणीव सरकारला असून देखील विविध कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात फटाक्यांचे उत्पादन होते. त्यावर बंधने आणली पाहिजेत. पर्यावरणपूरक म्हणजे कमी आवाजाचे, कमी प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती झाली पाहिजे.
-डॉ. अनिल पाटील, पर्यावरण तज्ज्ञ