पनवेल : पनवेलमध्ये काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत चालली आहे. राज्यातही काही भागांत रुग्ण वाढत असल्याने पालिका क्षेत्रात खबरदारीचे सर्व उपाय सक्तीने राबविण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी दिले आहेत.मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल. गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी दि. १९ रोजी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व विभागीय कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता घरी विलगीकरणात राहणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभात नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केल्या आहेत.