तळोजात पुन्हा अग्नितांडव; ९७० कारखान्यांची जबाबदारी १८ कर्मचा-यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:41 AM2017-11-03T06:41:37+5:302017-11-03T06:42:17+5:30
महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव सुरू झाले आहे. कंपन्यांना भीषण आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव सुरू झाले आहे. कंपन्यांना भीषण आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उद्योजकांची उदासीनता व अग्निशमन केंद्रातील अपुºया मनुष्यबळामुळे वेळेत आग आटोक्यात आणता येत नाही. ८६३ हेक्टर जमिनीवरील ९७० कारखान्यांची सुरक्षा फक्त १८ कर्मचाºयांवर अवलंबून असून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊन प्रचंड जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील टिकिकार कंपनीला २१ मार्च २०१६ रोजी भीषण आग लागली. या आगीमध्ये तब्बल चार जणांचा मृत्यू व ८ जण गंभीर जखमी झाले. जीवित व वित्तहानी झालेल्या या दुर्घटनेनंतर तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये अग्निशमनच्या नियमांचे पालन केले जात नाही. आग लागू नये व लागलीच तर ती तत्काळ विझविता यावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यक उपाययोजना करणे आवश्यक असते; परंतु बहुतांश कारखान्यांमध्ये काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याचे निदर्शनास येऊ लागले. अग्निशमनविषयी बहुतांश उपाययोजना फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले. तळोजा अग्निशमन केंद्राच्या वतीने सर्व कारखान्यांचे सुरक्षा आॅडिट करून त्यांना दाखला देणे आवश्यक असते. ज्या कारखान्यांमध्ये नियमांचे पालन केले नाही त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असते; परंतु नियम धाब्यावर बसवूनही संबंधितांवर काहीही कारवाई केली जात नाही. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेल्या छोट्याशा आगीचे काही वेळेत अग्नितांडवामध्ये रूपांतर होत असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहत ८६३ हेक्टर जमिनीवर वसली आहे. जवळपास ९७० कारखाने असून त्यामध्ये ७५ हजार नागरिकांना प्रत्यक्ष व ५० हजार नागरिकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होत आहे. एमआयडीसीचे स्वतंत्र अग्निशमन केंद्र आहे; परंतु या केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळच नाही. केंद्र चालविण्यासाठी ३६ कर्मचारी आहेत; परंतु प्रत्यक्षात १८ कर्मचारीच उपलब्ध आहेत. या कर्मचाºयांना तीन पाळ्यांमध्ये विभागल्यामुळे एक वेळी ६ कर्मचारीच कर्तव्यावर उपलब्ध असतात. मोठी आग लागली तर उर्वरित कर्मचाºयांची सुट्टी रद्द करावी लागते. आराम करण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयांनाही आग विझविण्यासाठी पाठवावे लागत आहे. अग्निशमनचे व निवासी संकुल सोडून कर्मचाºयांना इतर ठिकाणी जाताही येत नाही. खूप मोठी आग लागली की, तळोजा केंद्र हतबल होत असून सिडको, नवी मुंबई महानगरपालिका व वेळ पडल्यास मुंबई महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलवावे लागत आहे. शासनाने वेळेत याविषयी उपाययोजना केल्या नाहीत तर मोठी दुर्घटना होऊन एकाच वेळी शेकडो कर्मचाºयांचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासन यंत्रणा अग्नितांडव थांबविणार की नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
३० नोव्हेंबर २०१६ : येथील निडिलॅक्स केमिकल कंपनीला भीषण आग लागली. दीपक फर्टिलायझर कंपनीला लागून असलेल्या निडिलॅक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दीपक फर्टिलायझरमधील बंबाच्या साहाय्याने येथील आग विझविण्यात आली. लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.
२७ आॅगस्ट २०१७ : पराग केमिकलला २७ आॅगस्ट रोजी आग लागली. अमोनियाचा साठा असल्यामुळे आग भडकली व कंपनीमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. नवी मुंबई, तळोजा, कळंबोली, पनवेल अग्निशमन केंद्रातील वाहनांच्या साहाय्याने आग विझवली.
तळोजा औद्योगिक वसाहतीत वारंवार आग लागण्याची घटना घडत आहे. या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. नियम धाब्यावर बसविणाºया कारखानदारांवर कारवाई करण्यात यावी.
२९ जानेवारी २०१७ रोजी तळोजातील एका कोल्ड स्टोरेजला आग लागली. पाण्याच्या टाकीत पडून तीन कर्मचाºयांचा मृत्यू झाला होता. या घटनेविषयी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून कारखानदार कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली होती.
महत्त्वाच्या दुर्घटना...
मार्च २०१६
तळोजा एमआयडीसीतील टिकिटार कंपनीमध्ये २१ मार्चला भीषण आग लागली. या आगीमध्ये ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी अखिलेश गुप्ता, टुनटुन सिंग, संजीव सिंग व संजय वासू म्हात्रे या चार जणांचा मृत्यू झाला होता.
फेब्रुवारी २०११
तळोजामधील बुनेशा केमिकल कंपनीमध्ये ३ फेब्रुवारी २०११मध्ये भीषण आग लागली. ही आग पसरल्यामुळे शेजारी असलेल्या रचना अॅग्रोचेही नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या दक्षतेमुळे परिसरातील मोदी फार्मा, तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीचे आगीपासून रक्षण केले होते. आग विझविण्यासाठी दहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
आॅक्टोबर २००६
२८ आॅक्टोबरला येथील डॉर्फ केटल कंपनीला भीषण आग लागली. कंपनीमध्ये केमिकलचा मोठ्या प्रमाणात साठा होता. कंपनीत स्फोटही झाला होता. मुुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली.
डिसेंबर २०१३
तळोजामधील केमिकल कंपनीला ३ डिसेंबर २०१३ रोजी भीषण आग लागली. केमिकलचा स्फोट झाल्याने पूर्ण परिसर हादरून गेला होता. अग्निशमन जवानांनी कौशल्याने आग नियंत्रणात आणली होती.
एप्रिल २०१३
भूखंड क्रमांक तीन वरील चेम्सिक केमिकल कंपनीमध्ये आग लागली. रात्री ८.३० वाजता लागलेली आग पहाटे ६.३० वाजता विझली. आग विझविण्यासाठी दहा तास अथक परिश्रम करावे लागले होते.
जानेवारी २०११
येथील इंडियन आॅइल कंपनीमध्ये १८ जानेवारी २०११मध्ये आग लागली होती. ३० बंब व अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली होती.
१९ डिसेंबर २०१६
येथील मेंबा कंपनीला १९ डिसेंबरला अचानक आग लागली. आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आठ वाहनांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली होती. तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आणली होती.