गोदामांमुळेच आगीच्या दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:50 PM2019-01-22T23:50:27+5:302019-01-22T23:50:40+5:30
पनवेल, तळोजा परिसरात अनधिकृत गोदामांचे पेव फुटले आहे. भंगार सामानामुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल, तळोजा परिसरात अनधिकृत गोदामांचे पेव फुटले आहे. भंगार सामानामुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे रहिवाशांमधून असुरक्षिततेची भावना व्यक्त होऊ लागली आहे. बेकायदा गोदामांवर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारी नावडे गावातील गोदामाला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेज, गोदाम आणि दुकान थाटण्यात आले आहेत. या ठिकाणी भंगार, नादुरुस्त गाड्या, लाकडी सामान, टायर्स, प्लॅस्टिक ड्रम आदी सामान ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी नावडे येथील टायरच्या गोदामाला आग लागली. ती विझविताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. पोलिसांनी मात्र अकस्मित असल्याची नोंद करून आपले कर्तव्य बजावले; परंतु सिडको, रस्ते विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका प्रशासनाकडून या बाबत कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.
कळंबोलीपासून कल्याण फाट्यापर्यंत महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार गोदामे, गॅरेज सुरू आहेत. उरण आणि गोवा महामार्गालगतच्या रस्त्यावरही अशीच स्थिती आहे. याशिवाय खासगी जागा भाड्याने घेऊन बेकायदा टायर्स, भंगार गोदाम त्याचबरोबर गॅरेज सुरू करण्यात आले आहेत, याकरिता संबंधित यंत्रणांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही.
जमीनमालकाला भाडे मिळते आणि दुकानदार कमाई करीत असल्याने सुरक्षेचा विचार केला जात नाही, त्यामुळे वारंवार आगीच्या घटना घडत आहेत.
डिसेंबरमध्ये भंगार पाडा येथे टायर कटिंग करणाºया गोदामाला आग लागली होती. नावडे येथेही याअगोदर अशाच प्रकारच्या टायर्सच्या गोदामाला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी कळंबोली गावालगत असलेल्या गॅरेजला आग लागली. त्यामध्ये जवळपास पाच ते सहा गॅरेज जळून खाक झाले. येथे टायर साठवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या जुन्या टायरच्या गोदामाला आग लागली होती, त्याची झळ आजूबाजूच्या इमारतींना बसली होती.
गोदामात विशेष करून भंगाराचा व्यवसाय केला जातो. ज्वलनशील वस्तूंची येथे साठवणूक केली जात असल्याने रोहिंजन गावच्या हद्दीत भंगाराच्या गोदामाला अनेकदा आगी लागल्या आहेत. त्याचबरोबर पळस्पे येथेही टायरचे गोदाम जळून खाक झाले होते. अशा बेकायदेशीर व्यवसायामुळे आजूबाजूच्या गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गोदाम मालक आणि चालक दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
।आगीच्या घटना
२ डिसेंबर १८ भंगारपाडा
५ मार्च १८ कळंबोली
५ मार्च १८ धरणा कॅम्प
२९ मार्च १८ रोडपाली
१८ एप्रिल १८ स्टील मार्केट,
कळंबोली
८ जानेवारी १८ धरणा कॅम्प
१४ जानेवारी १८ रोहिंजन
२६ नोव्हेंबर १७ धानसर
१५ एप्रिल १६ कळंबोली
१६ जून १६ शिरढोण
१४ एप्रिल १५ रोडपाली
।पनवेल पालिका क्षेत्रात अनिधकृत गोदामांवर कारवाई सुरूच आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. त्याचबरोबर आग प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त, पनवेल महापालिका