लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गाळ्यांलगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात साठवलेल्या पुठ्यांमुळे हि दुर्घटना घडली. हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे दोन शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नसून गाळ्यांमधील मालाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फळ मार्केट मधील एन गल्लीत संध्याकाळी ४.२० च्या सुमारास हि घटना घडली. त्याठिकाणी व्यापारी गाळे व सुरक्षा भिंत यामधील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिकचे क्रेट साठवण्यात आले होते. त्याठिकाणी अज्ञाताने पेटते सिगारेट टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातूनच लागलेल्या छोट्या आगीचा काही क्षणातच मोठा भडका उडाला. यामुळे त्याठिकाणच्या व्यापारी व कामगारांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशीसह सर्वच अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर संध्याकाळी सहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र कुलींगचे काम पुढील दिड तास सुरु होते. व्यापारी गाळ्यांच्या पोटमाळ्यावर देखील साहित्य असल्याने, प्रत्येक गाळ्याच्या वरच्या भागावर जाऊन पाण्याचा मारा करावा लागत होता. परंतु संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेले कागदी पुठ्ठे व इतर साहित्यांमुळे अग्निशमन जवानांना आग वीजवण्यात तारेवरची कसरत करावी लागली.
काही मिनिटातच आगीने रौद्रय रूप धारण केल्याने त्याठिकाणी हजारोच्या संख्येत कामगार जमले होते. व्यापारी गाळ्यांमध्ये अथवा उघड्यावर शेड उभारून आश्रयाला असलेल्या कामगारांच्या वापराचे गॅस सिलेंडर देखील त्याठिकाणी होते. आगीमुळे त्यांचा स्फोट झाल्यास इमारतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आग वीजवण्याचे काम सुरु असतानाच त्याठिकाणचे पुठ्ठे व सिलेंडर तातडीने हटवण्यात आले. या आगीत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. मात्र आग लागल्यानंतर झालेल्या पळापळीत काही कामगारांनी वरून उड्या मारल्याचे समजते. आगीमध्ये त्याठिकाणची २५ हुन अधिक गाळे जळून खाक झाले आहेत. यामध्ये त्याठिकाणी साठवण्यात आलेल्या कोट्यवधींच्या फळमालाचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच एपीएमसी प्रश्नाचे अधिकारी व पोलीस यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.
एपीएमसी आवारात यापूर्वी देखील अनेकदा आग लागल्याची घटना घडली आहे. तर गुरुवारी ज्याठिकाणी आग लागली त्याच ठिकाणी यापूर्वी देखील कागदी पुठ्ठयांमुळेच आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्यानंतर गाळ्याभवती पुठ्ठयांची साठवणूक करण्याला मनाई केल्यानंतरही जागोजागी त्यांचा साठा केलेला आहे. त्यासाठी प्लास्टिकचे शेड उभारण्यात आले आहेत. हेच प्लास्टिक पेटल्याने काही क्षणात आग इतरत्र पसरली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"