मसाला मार्केटमधील गोडाऊनला आग; १५ तास आग विझविण्याचे काम सुरू; अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या
By नामदेव मोरे | Published: July 17, 2023 09:41 PM2023-07-17T21:41:04+5:302023-07-17T21:42:22+5:30
सायंकाळी ७ पर्यंत अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील कुलस्वामीनी फुड्स या सुकामेव्याच्या गोडाऊनला पहाटे आग लागली. दिवसभर आग विझविण्याचे काम सुरू होते. १५ तासानंतरही गोडाऊनमधून धूर येत होता. सायंकाळी ७ पर्यंत अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.
मसाला मार्केटमधील एच २३ या गोडाऊनमध्ये पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोड व इतर सुकामेवा साठविण्यात आला होता. आक्रोडने क्षणात पेट घेतल्यामुळे आग संपूर्ण गाळ्यात पसरली. बाजार समिती सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर तत्काळ वाशी अग्निशमन दलाची वाहने आग विझविण्यासाठी मार्केटमध्ये दाखल झाली. पाण्याचा वापर करून आग विझविली जात होती. परंतू आक्रोडचे तेल निघाल्यामुळे आग सारखी भडकत होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते. आगीमुळे गाळ्याचे व आतमधील साहित्याचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते. १५ तास सुरू असलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या झाल्या होत्या.
मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे एच विंगमधील विजपुरवठा दिवसभर खंडीत करण्यात आला होता. येथील व्यापारावरही परिणाम झाला होता. बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन -
बाजार समितीमध्ये अग्निशमन दलाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. यापुर्वी फळ मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर एक समितीही नियुक्त केली होती. या समितीने सर्व मार्केटमध्ये काय उपाययोजना करायच्या याविषयी अहवाल दिला होता. परंतु व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे आग लागल्यानंतर ती वेळेत नियंत्रणात आणण्यात अडथळे निर्माण होत आहेत.