मधुकर ठाकूर
उरण : आठ दिवसांपूर्वी वेश्वी येथील सामवेद लॉजिस्टिकला लागलेल्या आगीचा धुरळा बसण्याच्या तयारीत असतानाच सोमवारी (१५) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उरणमधील चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णौ लॉजिस्टिक कंटेनर मालाच्या गोदामाला आग लागली.रसायन भरलेल्या एका कार्गो कंटेनरला लागलेल्या आगीत एक कार्गो आणि पोकलेन आदी मशिनरी आगीत भस्मसात झाली.मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबाच्या साहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. येथील वैष्णो लॉजिस्टिक कंटेनर मालाच्या गोदामात एका हजरडस्ट ठेवण्यात आलेल्या कार्गो कंटेनरला अचानक आग लागली.आगीच्या भक्षस्थानी घातक रसायनांचा साठा असलेले ड्रम पेटल्याने क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीचे लोण आसमंताला भिडले.काळ्या धुरामुळे आसमंत काळंवडला.या आगीत रसायन भरलेला एक कार्गो कंटेनर आणि पॉकलन जळून खाक झाला आहे. आगीची घटना समजताच घटनास्थळी जेएनपीए, सिडको, नवीमुंबई अग्निशमन दलाच्या पाच बंब दाखल झाले.अग्नीशमक दलाच्या जवानांनी ११ बंब आणि फोमच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.रसायनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.पंचनामे करून चौकशीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.दोन वर्षांपूर्वी याच लॉजिस्टिकला भीषण आग लागली होती.नव्या वर्षातील उरणमधील ही दुसरी घटना आहे.