बंद मॅफ्को मार्केटमध्ये आग
By admin | Published: January 21, 2016 02:56 AM2016-01-21T02:56:53+5:302016-01-21T02:56:53+5:30
तुर्भे येथील बंद स्थितीतल्या मॅफ्को मार्केटच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या
नवी मुंबई : तुर्भे येथील बंद स्थितीतल्या मॅफ्को मार्केटच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या मार्केटच्या इमारतीमधील थर्माकोल व डांबराच्या साठ्याने पेट घेतल्याने ही घटना घडली. मात्र आगीचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही.
राज्य शासनाच्या मॅफ्को मंडळाच्या तुर्भे येथील इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. सन २००९ पासून मॅफ्को मार्केटची ही इमारत वापरात नसल्याने मोडकळीस आलेली आहे. रिक्त असलेल्या या इमारतीमध्ये बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या इमारतीमधून धूर येत असल्याचे लगतच व्यापार करणाऱ्या काही फेरीवाल्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी अग्निशमन दलाला देताच वाशी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे स्पष्ट झाले.
त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात थर्माकोल व डांबराचा साठा केलेला होता. हे साहित्य पेटल्याने उग्र दुर्गंधी येवून परिसरात धुराचे लोट पसरत होते. परंतु आगीमुळे लगतच्या एपीएमसी मार्केटलाही धोका उद्भवण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यावर नियंत्रण मिळवून संभाव्य दुर्घटना टाळली. (प्रतिनिधी)