तळोजातील कंपनीला आग
By admin | Published: November 17, 2016 06:34 AM2016-11-17T06:34:09+5:302016-11-17T06:34:09+5:30
औद्योगिक वसाहतीत मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका कंपनीत आग लागली.
तळोजा : औद्योगिक वसाहतीत मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका कंपनीत आग लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ही आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
तळोजातील ‘जे ७७’ या प्लॉट येथील कैराव या केमिकल कंपनीत रात्री २.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पनवेल, कळंबोली, नवी मुंबई, अंबरनाथ येथून एकूण १५ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तळोजात कैराव केमिकल कारखान्यात लागलेल्या या आगीच्या विळख्यात दोन टँकरही जळून खाक झालेले आहेत. या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या आवारात असलेल्या केमिकलने भरलेल्या १०० फुटांहून अधिक उंच असलेल्या टाक्यांचाही या वेळी स्फोट झाला.
तळोजा औद्योगिक परिसरात एकूण ८७९ छोटे-मोठे कारखाने आहेत. मात्र, तळोजा अग्निशमन दलाकडे पुरेशा यंत्रणा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आग लागल्यानंतर बाहेरून अग्निशमन वाहने बोलवावी लागत आहेत. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (वार्ताहर)