नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री आठ ते दहा असे फक्त दोन तास फटाके वाजवण्याची मुभा असताना नवी मुंबईकरांनी या आदेशांना ठाणे खाडीत बुडविल्याचे दिसले. यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळच्या पहिल्या अंघोळीनंतर पाच वाजताच फटाक्यांच्या आवाजाने अनेकांना जागे केले. यानंतर संध्याकाळी लक्ष्मीपूजनानंतर ते या आतषबाजीस अधिक उधाण आल्याचे दिसले. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत फटाक्यांचा आवाज सुरूच होता.मात्र, फटाके फोडणाऱ्या पोलिस, महापालिका वा अन्य कोणत्याही प्रशासनाने कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यातच विश्वचषक सामन्यात भारताने दणक्यात विजयोत्सव साजरा केल्यानंतर शहराचा सारा आसमंत फटाक्यांचा धूर आणि आतषबाजीने व्यापलेला होता.फटाके दुकाने रात्री उशिरापर्यंत सताड उघडी
नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी सर्व नियमांना धाब्यावर बसवून शहरात अनेक ठिकाणी भररस्त्यात आणि नागरी वसाहतींना लागूनच फटाके दुकानांना परवानगी दिली आहे. यातील एकाही दुकानात आगप्रतिबंधक ज्या उपाययोजना आहेत, तसे दोन दुकानांतील सामाईक अंतर, २०० लिटर पाण्याचा साठा, फायर प्रतिबंधक उपकरणे यांचा अभाव होता. तसेच रात्री दहानंतर बारा ते एक वाजेपर्यंत दुकाने उघडी होती. ऐरवी रात्री ११ नंतर दुकाने बंद करायला धावणाऱ्या पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.