ऐरोलीतील सिलिंडर स्फोटात अग्निशमनचे कर्मचारी जखमी, पंपहाउसमध्ये सुरक्षारक्षकांचा निवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 03:22 AM2019-11-25T03:22:17+5:302019-11-25T03:24:02+5:30
आग विझवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
नवी मुंबई : आग विझवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोसायटीकडून इमारतीच्या पंपहाउसमध्ये बेकायदेशीरपणे सुरक्षारक्षकाच्या राहण्याची सोय करण्यात आलेली होती. या ठिकाणी खाद्यपदार्थ शिजवताना कपड्यांनी पेट घेतल्याने आग लागली. त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दोनपैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये पंपहाउसची भिंती फुटून परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे.
ऐरोली सेक्टर ८ येथील कृष्णा हाईट या इमारतीमध्ये शनिवारी रात्री ८च्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या पंपहाउसमध्ये आग लागल्याची माहिती ऐरोली अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार, अग्निशमनचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी गेले होते. त्यांच्याकडून पंपहाऊसमधील आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आतील सिडरचा स्फोट झाला. यामुळे पंप हाउसची भिंती फुटून विटांचे तुकडे व इतर साहित्य उडून अग्निशमन कर्मचाऱ्यांवर कोसळले. यामध्ये सहायक केंद्र अधिकारी एकनाथ पवार, आर. आर. कोकाटे व एस. बी. परब हे तिघेजण जखमी झाले. त्यांंच्यावर चेहºयावर, शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
पंपहाउसमध्ये सिलिंडर असल्याची कल्पना अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नव्हती. सोसायटीकडून सुरक्षारक्षकाच्या राहण्याची सोय इतरत्र करणे आवश्यक असतानाही पंपहाउसमध्येच सुरक्षारक्षकाचे घर बनवण्यात आले होते. सुरक्षारक्षकानी स्वयंपाकासाठी त्या ठिकाणी दोन गॅस सिलिंडरदेखील ठेवले होते. त्यापैकी एक सिलिंडर वीजमीटरच्या जवळच ठेवण्यात आला होता.
यामुळे आग सिलिंडरपर्यंत पसरताच त्याचा स्फोट होऊन पंपहाउसची भिंत फुटली आणि स्फोटात अग्निशमनचे कर्मचारी जखमी झाले.
यानंतरही अग्निशमनच्या कर्मचाºयांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग इमारतीपर्यंत पसरली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे सुरक्षारक्षकांच्या वास्तव्यासाठी पंपहाउस अथवा जिन्याखालील जागांचा होत असलेला वापर धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.