नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १९ येथील खाडीकिनारी असलेल्या झोपड्यांना सिलिंडर स्फोटामुळे बुधवारी आग लागली. आगीत २0 झोपड्या जळून खाक झाल्या. आगीमुळे रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका झोपडीत गॅस सिलिंडर लिक होता अचानक त्याचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती रहिवाशांनी दिली. आग संपूर्ण झोपडपट्टी परिसरामध्ये पसरली. आगीमध्ये सायकली, कपडे, पंखे, फ्रीज, टीव्ही आणि सोन्याचे दागिने, रोकड खाक झाली. इतकेच नव्हे तर संतोष राठोड या लेबर सप्लायर्सकडे कामगारांना पगार देण्यासाठी घरी असलेल्या एक लाख रु पयांच्या २00 आणि ५00 रु पयांच्या नोटा अर्धवट जळून गेल्या आहेत.
आग विझविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सहा आणि एमआयडीसीच्या दोन अशा अग्निशमन दलाच्या आठ बंबांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळी ५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या नेरूळ येथील अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी ए.डी. बोºहाडे यांनी सांगितले की, ही भीषण आग कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे या भीषण आगीच्या गंभीर घटनेचा तपास करीत आहेत.