दिघा येथे आगडोंब; दोन दुकाने खाक, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:37 AM2019-11-27T02:37:27+5:302019-11-27T02:38:07+5:30

दिघा येथे लागलेल्या आगीमध्ये अवैध हुक्का पार्लरसह इतर तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

Fire at Digha, three injured | दिघा येथे आगडोंब; दोन दुकाने खाक, तिघे जखमी

दिघा येथे आगडोंब; दोन दुकाने खाक, तिघे जखमी

Next

नवी मुंबई : दिघा येथे लागलेल्या आगीमध्ये अवैध हुक्का पार्लरसह इतर तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आगीत तिघे जण जखमी झाले असून, इमारतीजवळ उभी असलेली वाहनेही जळून खाक झाली आहेत. तळमजल्यावरील दुकानात लागलेली आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली.

गणपती पाडा परिसरातील एक मजली इमारतीमध्ये मंगळवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्या ठिकाणी असलेल्या मयूर टाइल्स या मार्बल दुकानाच्या पहिल्या मजल्यावर मिलियन्स नावाचा हुक्का पार्लर चालवला जात होता. सुमारे एक महिन्यापूर्वीच हा अवैध हुक्का पार्लर त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता, असेही समजते. मार्बलच्या दुकानालगतच एक सायबर कॅफेही चालवला जात होता. मंगळवारी सकाळी संपूर्ण इमारत पेटल्याने तिथल्या हुक्का पार्लरसह सायबर कॅफे व मार्बलचे दुकान जळून खाक झाले.

तळमजल्यावरील सायबर कॅफेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. ही आग वरच्या मजल्यापर्यंत पसरल्याने हुक्का पार्लरमधील साहित्यही पेटू लागले. त्यामुळे भयभीत झालेल्या कामगारांनी बचावासाठी वरच्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यामध्ये तिघे जण जखमी झाले असून ते काही प्रमाणात भाजलेही आहेत.

आगीच्या ज्वाळांमुळे इमारतीखाली उभी असलेली एक कार व दोन दुचाकी अशी तीन वाहनेही जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आग अधिक पसरत असल्याने त्यापासून काही अंतरावरील पेट्रोलपंपलाही धोका निर्माण झाला होता. यामुळे त्या ठिकाणची इतर वाहने जेसीबीच्या मदतीने बाजूला करण्यात आली. तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण इमारत जळून खाक झाली होती.

दुर्घटना रात्रीच्या वेळी घडली असती, तर त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली असती अशी भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्या ठिकाणी अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवला जात असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात होती. परिणामी, रात्रीच्या वेळी परिसरातील तरुण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमून नशा करत बसलेले असतात. अशा वेळी आग लागली असती, तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.

मंगळवारी लागलेली आग हुक्का पार्लरमुळेच लागल्याचीही शंका परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या दुर्घटनेप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

रस्त्यावरील वाहनांनी घेतला पेट
आग लागलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच पेट्रोलपंप होता. त्यामुळे आग अधिक पसरल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच रस्त्यावरील वाहने पेट घेऊ लागल्याने त्यांच्या स्फोटातून आग सर्वत्र पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

तळमजल्यावरील दुकानात आग लागल्याने ती वरच्या मजल्यापर्यंत पसरल्याने तिथली तीन दुकाने जळाली आहेत. आगीच्या वेळी वरच्या मजल्यावर अडकलेल्या व्यक्तींनी बचावासाठी खाली उड्या मारल्याने तिघे जण जखमी झाले आहेत. त्या ठिकाणी हुक्का पार्लरही चालवला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
- सतीश गोवेकर,
सहायक पोलीस आयुक्त

Web Title: Fire at Digha, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.