लघुउद्योजकांकडून अग्निसुरक्षेला हरताळ; सुरक्षा नियमांबाबत उदासीनता, अनधिकृतपणे स्टोव्हसह गॅसचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:10 AM2018-02-16T03:10:56+5:302018-02-16T03:11:03+5:30
महापालिका क्षेत्रातील लघुउद्योजकांनी अग्निशमन नियमांना हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे. घर व दुकान एकाच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. दुकानामध्येच अनधिकृतपणे स्टोव्ह किंवा गॅसचा वापर करून स्वयंपाक केला जात आहे. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील लघुउद्योजकांनी अग्निशमन नियमांना हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे. घर व दुकान एकाच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. दुकानामध्येच अनधिकृतपणे स्टोव्ह किंवा गॅसचा वापर करून स्वयंपाक केला जात आहे. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऐरोली सेक्टर ३ मध्ये घर व दुकानाला आग लागून माय-लेकींचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे घराचा मिश्र वापर सुरू असलेल्या घर व दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनपा क्षेत्रामध्ये ५ हजार पेक्षा निवासी घरांचे व्यावसायिक गाळ्यामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामध्ये अनधिकृतपणे स्टील्टमध्ये सुरू केलेल्या गाळ्यांचाही समावेश आहे. अनेक ठिकाणी गाळ्यामध्ये व्यवसाय सुरू आहेच शिवाय त्याच ठिकाणी दुकान चालक किंवा कामगार वास्तव्य करत असतात. घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पैसे वाचविण्यासाठी अनेक परप्रांतीय दुकानाचाच घर म्हणून वापर करत आहेत. काही ठिकाणी कामगारांना गाळ्यात वास्तव्य करण्याची परवानगी दिली जात आहे.
ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरूळमध्ये हे प्रमाण जास्त आहे. घर व दुकान असा संमिश्र वापर करण्यात येत असलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी दुकानामधून पोटमाळ्यावर किंवा वरील मजल्यावर जाण्यासाठी जिना ठेवण्यात आला आहे. रात्री शटर बंद केल्यानंतर बाहेर जाण्यासाठी पर्यायी मार्गच रहात नाही. ऐरोलीमधील घटनेमध्येही शटर उघडता आले नाही व वरील मजल्यावरून खाली उतरण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने दोघांना जीव गमवावा लागला आहे.
नवी मुंबईमध्ये दुकानामध्ये स्टोव्ह व गॅसवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण वाढत आहे. दुकानामध्ये दाटीवाटीने साहित्य ठेवलेले असते. यामध्ये प्लास्टीक व इतर गोणी असतात. आगीच्या पटकन भक्षस्थानी पडतील अशाप्रकारचे साहित्य असते. अपुºया जागेमध्येच स्टोव्हवर स्वयंपाक केला जातो. यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. अनेक ठिकाणी घरगुती वापराच्या मीटरचा व्यावसायिक वापर केला जात आहे. काही ठिकाणी तीन घरामध्ये एकाच मीटरमधून वीज कनेक्शन देण्यात आले आहे. यामुळे शॉर्टसर्किटच्या घटना घडत आहेत. वीज चोरी व अवैध वीज वापरामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. आग लागल्यास ती विझविण्यासाठी साधने दुकानांमध्ये नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बोनकोडेत गोडाऊन
बोनकोडे गावामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी कापड, फर्निचर व इतर वस्तूंचा साठा केला जात आहे. या गोडाऊनमध्ये अग्निशमन नियमांचे पालन केले जात नाही. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी याविषयी एक वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करण्यात यावी. अग्निशमन नियमांचे पालन केले जावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु महापालिका प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असून भविष्यात ऐरोलीप्रमाणे दुर्घटना घडल्यास त्यास पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.
एपीएमसीची सुरक्षाही धोक्यात
मुंंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये गाळ्यांमध्येच स्टोव्हवर परप्रांतीय कामगार स्वयंपाक करत आहेत. यासाठी अनधिकृतपणे स्टोव्ह व गॅसचाही वापर केला जात आहे. दोन्ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व खोकी असतात. कोणत्याही क्षणी आग लागण्याची शक्यता आहे. याशिवाय ट्रक व कंटेनरच्या खालीही स्टोव्हचा वापर केला जात असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
अग्निशमन नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. दुकान व घर असा संमिश्र वापर सुरू असलेल्या गाळे व घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- अंकुश चव्हाण,
अतिरिक्त आयुक्त,
महापालिका